गंडवागंडवी कराल तर ऊसाच कांड देखील तोडू देणार नाही: राजू शेट्टी यांचा इशारा
कोल्हापूर प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी मागील हंगामातील ऊसाला 400 रुपये दूसरा हप्ता देण्याची केलेली मागणी चुकीची आहे, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणतात. तर आमदार सतेज पाटील आधीचं मागू नका पुढच्या हंगामात वाढवून देतो, असे म्हणत आहेत. याचा अर्थ साखर कारखान्यांकडे पैसे शिल्लक आहेत, आम्ही कोणतीही चुकीची मागणी केलेली नाही. साखरेला जास्त दर मिळाला असताना देखील यांना आमचे पैसे द्यायचे नाही आहेत. व्यापाऱ्यांना कमी दराने साखर विकल्याचे दाखवून रोखीने काळा पैसा घेतला आहे, अशा पद्धतीने जर कारखानदार गंडवागंडवी करणार असतील तर यंदाच्या हंगामात ऊसाच कांड देखील तोडू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेमध्ये दिला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज जयसिंगपूर येथील राजे विक्रमसिंह क्रीडांगणावर 22 वी ऊस परिषद झाली. याप्रसंगी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार शेट्टी बोलत होते.
माजी खासदार शेट्टी म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून स्वाभिमानीने गत हंगामातील तुटलेल्या ऊसाला 400 रुपये दूसरा हप्ता द्यावा आणि चालू हंगामातील दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. मात्र यासंदर्भात सरकार आणि कारखानदार यांच्याकडून कोणतीच हालचाल होताना दिसत नाही. दिवाळी चार दिवसांवर आली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या तोंडावर आनंद नाही आहे. त्यामुळे सरकारने दूसरा हप्ता देण्यासाठी हालचाली कराव्यात अन्यथा सगळ्यांचा शिमगा होईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला. तसेच दूसरा हप्ता दिला नाही तर आपणही दिवाळी साजरी करणार नाही. दिवाळी संपेपर्यंत याच व्यासपीठावर राहणार आहे. त्यामुळे माझ्या जेवणाची व्यवस्था करा, असा आक्रमक पवित्रा शेट्टी यांनी घेतला.
अण्णा को गुस्सा क्यूँ आता है
अण्णा को गुस्सा क्यूँ आता है! आण्णा की बात न्यारी असे म्हणत शेट्टी यांनी प्रकाश आवाडेंवर निशाणा साधलाय. तर हसन मुश्रीफ यांच्यापासून अण्णा, गणपतराव पाटील, यड्रावकर सगळे सारखेच आहेत. असं देखील ते म्हणाले.
कारखान्यांवर आमची चार माणसे ठेवायची परवानगी द्या
साखर कारखान्यावर आमची चार माणसं ठेवायची परवानगी द्या, उसाची रिकव्हरी कशी वाढते ती दाखवून देतो. काटामारीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर 500 टनापेक्षा जास्त ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांची नावं जाहीर करा. डिजिटल काटे करून ते ऑनलाईन पद्धतीने जोडले पाहिजे, अशी मागणी आहे. पण हे सरकार कारखानदारांच्या ताटाखालील मांजर झालं असल्याने ते काय करणार नाही, अशी टिका शेट्टी यांनी केली.
तर आपणही एक झालं पाहिजे
दूरसा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी कुणीही तयार नाही. आता आपल्याला आपल्याच हिमतीवर पैसे मिळवावे लागतील. शेतकऱ्यांना बुडवायला जर कारखानदार एक होत असतील, तर आपल्या हक्काचो पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनीही एक झालं पाहिजे, असं आवाहन शेट्टी यांनी केले.