For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा

12:41 PM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा
Advertisement

रायबंदरवासियांचा सरकारला इशारा : येत्या 30 सप्टेंबरपर्यंतची दिली मुदत

Advertisement

पणजी : पणजी स्मार्ट सिटीच्या कामांमुळे खराब झालेले रस्ते आणि जीवघेण्या खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या रायबंदरच्या नागरिकांनी काल रविवारी रस्त्यावर उतऊन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत सरकारचा निषेध केला. रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ते त्वरित दुरूस्त करण्यासाठी नागरिकांनी सरकारला 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत रस्ते दुरूस्त न झाल्यास ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा रायबंदरवासियांनी दिला आहे. खराब रस्त्यांचा रायबंदरवासियांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालेला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना, विशेषत: दुचाकीचालकांना धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी चर बुजविण्यासाठी घातलेल्या डांबरामुळे उंचवटे तयार झालेले आहेत. अनेक ठिकाणी डांबरातील खडी उखडून सर्वत्र पसरल्याने ती खडी दुचाकीचालकांना धोकादायक बनली आहे. त्यावरुन दुचाकी घसरुन पडण्याचा धोका असतो.

पुराचाही धोका संभवतो

Advertisement

स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या कामांमुळे रायबंदरवासीय संत्रस्त झालेले आहेत. गटारांच्या अर्धवट बांधकामामुळे वाहनांना अडचण निर्माण झालेली आहे. सर्वत्र पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार घडत असून अतिवृष्टीदरम्यान पुराच्या धोक्यासह आणखी समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे,असे रायबंदरवासियांनी सांगितले.

महापालिका, स्मार्ट सिटीकडून टोलवाटोलवी

रायबंदरमधील रस्ते कधी दुरूस्त होणार, या बाबत महापालिकेला विचारले तर ते स्मार्ट सीटीकडे बोट दाखवितात. स्मार्ट सीटीच्या अभियंत्यांकडे विचारणा केली तर ते पणजी महापालिकेकडे बोट दाखवितात. या टोलवाटोलवीत रायबंदरच्या नागरिकांची गोची होत आहे.

जगणेही झाले मुश्किल

खराब रस्त्यांमुळे धूळीचेही प्रदूषण होत आहे, जे लोकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. ऊन पडल्यास धुळीचे साम्राज्य तयार होते, यावेळी रस्त्यावर पाणी शिंपडण्याचे सौजन्यही महापालिका किंवा स्मार्ट सिटीकडून दाखविले जात नाही, एकंदरित रायबंदरवासियांचे जगणेच मुश्किल झाले आहे, असे रायबंदरवासियांनी सांगितले. राजधानी पणजीची परिस्थिती इतकी वाईट असेल, तर गोव्यातील इतर भागांची स्थिती किती वाईट असेल, याचा विचारच करवत नाही. जोपर्यंत रस्त्यांची दुऊस्ती होत नाही आणि गटार व्यवस्था पूर्ववत होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार रायबंदरवासियांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.