तीन महाविद्यालयांसाठी उभारणार संकुल
फार्मसी, आर्किटेक्चर व संगीत महाविद्यालयांचा समावेश : फार्मसी कॉलेजच्या नव्या इमारतीची लवकरच पायाभरणी
पणजी : गोवा विद्यापीठाच्या परिसरातील 2 लाख चौ.मी. जागेत तीन महाविद्यालयांचे संकुल बांधण्याची योजना आहे. त्यात फार्मसी, आर्किटेक्चर व संगीत महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. फार्मसीच्या नवीन महाविद्यालयाची पायाभरणी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. काल सोमवारी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त उच्च शिक्षण संचालनालय, विद्यार्थी संघटना, माहिती व प्रसिद्धी खाते यांच्यातर्फे राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित केलेल्या तरुण विद्यार्थी मेळाव्यात ‘विद्यार्थी तसेच तरुण नेतृत्व’ चर्चासत्रातील मुलाखतीत डॉ. सावंत यांनी वरील माहिती दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. आर्यन खेडेकर यांनी त्यांची ही मुलाखत घेतली. यावेळी विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस वीरेंद्र सोळंकी, उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर व इतर मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
गोव्यात मेट्रोसाठी प्रयत्न सुरू
गोव्यात मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्याच्या उद्देशाने प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून भविष्यात गोव्यात हा प्रकल्प नक्की येणार असल्याची आशा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील मेट्रो प्रकल्पाबाबत सध्या नियोजन स्तरावर काम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काही वर्षांत सुरू होणार मेट्रो
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गोव्यात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी प्राथमिक स्तरावर काम चालू असून प्रस्ताव तयार केला जात आहे. मेट्रो सुरु व्हावी म्हणून भारतीय रेल्वे मंत्रालय व इतर संबंधित केंद्रीय मंत्रालयांशी चर्चा करण्यात येत आहे. ही चर्चा सकारात्मकदृष्ट्या पुढे जात आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात राज्यात मेट्रो येणार हे निश्चित आहे.
आयटी हब स्थापन करणार
सध्या राज्यातील आयटी कंपन्यात वाढ होत असून अंदाजे 50 कंपन्या राज्यात काम करतात. त्या सर्वांना समावून घेण्यासाठी गोव्यात आयटी हब स्थापन करण्याचा इरादाही डॉ. सावंत यांनी बोलून दाखवला.
मोबाईल, इंटरनेटचा योग्य वापर करा, ध्येय गाठा!
डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले की, राज्यात 40 ठिकाणी मोफत वायफाय इंटरनेट सेवा अर्थात हॉटस्पॉट सुरु केले आहेत. त्याचा वापर करुन विद्यार्थ्यांनी हवी ती माहिती मिळवावी. पूर्वी माहिती मिळवणे अवघड काम होते. त्यासाठी पुस्तके शोधावी लागायची परंतु आता मोबाईल, इंटरनेटमुळे माहिती मिळवणे सोपे झाले आहे. परंतु विद्यार्थी त्याचा चांगला उपयोग करण्यापेक्षा वाईट उपयोग करतात याकडे डॉ. सावंत यांनी विद्यार्थीवर्गाचे लक्ष वेधले. मोबाईल व इंटरनेटचा वापर करुन स्वत:चा विकास साध्य करा आणि ठरवलेले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला डॉ. सावंत यांनी तरुण विद्यार्थ्यांना दिला.
तरुणांना राजकारणात संधी
आजच्या तरुणांनी राजकारणात उतरावे आणि त्यांना तशी संधी आहे, असे डॉ. सावंत यांनी तरुणांना सूचित केले. या अगोदर विद्यार्थ्यांना राजकारणात संधी मिळणे अशक्य होते. कॉलेजस्तरावरील काही निवडणुकीत ते उतरायचे एवढेच काय ते! परंतु अलिकडे विद्यार्थीदशेतच अनेक तरुणांना तशी राजकारणाची संधी मिळते. भाजपमध्ये तर 50 टक्के विद्यार्थ्यांचा नेते म्हणून राजकीय प्रवास चालू असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला.