वायनाडसंबंधी इशारा आधीच दिला होता
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची संसदेत माहिती
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केरळमधील वायनाड येथे अतिवृष्टी होणार असून दरडी कोसळण्याचा धोका आहे, तसेच मोठ्या प्रमाणात भूस्खलनही होऊ शकते, असा इशारा केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने केरळच्या राज्य सरकारला आधीच दिला होता, असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिले आहे. ते बुधवारी सभागृहात या भीषण नैसर्गिक आपत्तीसंबंधी वक्तव्य करीत होते. केंद्र सरकारने ही नैसर्गिक आपत्ती कोसळण्यापूर्वीच आपले उत्तरदायित्व इशारा देऊन पार पाडले होते. तसेच केंद्र सरकारने आपत्ती निर्माण झाल्यानंतरही आपली साहाय्यता पथके आणि साहाय्यता सामग्री पाठवून आपत्ती निवारण कार्यात भरीव योगदान दिले आहे. सध्याची परिस्थिती या विषयावर राजकारण करण्याची नसून सर्वांच्या सहकार्याने आपत्तीग्रस्त नागरिकांची सुटका करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची आहे. केंद्र सरकार केरळमध्ये आपला कार्यभार उचलत असून आतापर्यंत केंद्रीय संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसत असले तरी, अद्यापही साहाय्यता कार्य होत आहे. आवश्यकता असेपर्यंत ते होत राहील, असा त्यांच्या वक्तव्याचा आशय होता.