गाथा पारायणात वारकऱ्यांची मांदियाळी
नागरिक भक्तीत तल्लीन : विविध कार्यक्रम
बेळगाव : अनगोळ येथील एसकेई स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या तुकोबांच्या अखंड गाथा पारायण सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची मांदियाळी दिसून येत आहे. तिसऱ्या दिवशीही भाविक आणि वारकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. काकड आरती, गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर यामध्ये वारकरी तल्लीन झाले आहेत. यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण होऊ लागले आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत तुकोबांचे गाथा पारायण होत आहे. या सोहळ्याला बेळगावसह खानापूर, चंदगड परिसरातून वारकरी आणि भक्त दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे हा सोहळा एका वेगळ्या उंचीवर जाऊ लागला आहे. दररोज विविध भक्तिमय कार्यक्रम होत आहेत. मंगळवारी पहाटे काकड आरती, त्यानंतर तुकोबा गाथा पारायण, दुपारी हरिपाठ, तसेच शहापूर येथील नामदेव दास भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी महाभिषेक झाल्यानंतर हरिपाठ झाला. सायंकाळी 5 ते 6 कणेरीमठ कोल्हापूर येथील श्री सिद्धगिरी संस्थान मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजींचे प्रवचन झाले. रात्री 7 ते 9 या वेळेत श्रीक्षेत्र औसा संस्थानचे प्रमुख हभप गुरुनाथ महाराज औसेकर यांचे कीर्तन झाले.
येळ्ळूरवासियांकडून पुरणपोळीचा महाप्रसाद
या गाथा पारायण सोहळ्यासाठी मंगळवारी येळ्ळूरवासियांकडून पुरणपोळीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. सर्व भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. बुधवार दि. 23 रोजी श्रीक्षेत्र आळंदी पुणे येथील हभप श्रीकांत महाराज पातकर यांचे सायंकाळी 5 ते 6 या वेळेत प्रवचन तर रात्री 7 ते 9 या वेळेत श्रीक्षेत्र बीड येथील हभप महंत महामंडलेश्वर अमृत महाराज जोशी यांचे कीर्तन होणार आहे.