For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vari Pandharichi 2025: भक्ती अन् सामाजिक एकतेचे दर्शन, दर्ग्यासमोर विठुनामाचा गजर

06:16 PM Jun 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
vari pandharichi 2025  भक्ती अन् सामाजिक एकतेचे दर्शन  दर्ग्यासमोर विठुनामाचा गजर
Advertisement
टाळ-मृदुंगाचा गजरात मुस्लिम तरुणांसह नागरिक रिंगण सोहळ्यात सहभागी
मिरज : अल्ला करे सो होय बाबा करतारका शिरताज । गाऊ बछरे तिस चलावे यारी बाधो न सात ।।
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे धर्म आणि माणसा-माणसातील वितुष्ट दूर होऊन अध्यात्माच्या संगतीने मानवता व एकतेचे दर्शन घडविणारा वारकऱ्यांचा रिंगण सोहळा शनिवारी शहरातील हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब दर्ग्याच्या प्रांगणात रंगला.
दर्ग्याच्या मोहरम खान्यासमोर आलाव्यालाचा रिंगण करुन वारकऱ्याऱ्यांनी ख्वाजासाहेबांच्या अंगणात भक्तीचा मिलाप घडवून आणला. टाळ-मृदुंगाचा गजर आणि जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने परिसर भक्तीमय झाला.
वारकऱ्यांच्या संगतीने मुस्लिम तरुणांसह काही नागरिकांनी या रिंगण सोहळ्यात सहभाग घेत सामाजिक एकतेचे अनोखे दर्शन घडविले.आषाढी एकादशी निमित्त सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो वारकरी पायी दिंडीने मिरजमार्गे पंढरपूरकडे जात आहेत. या वारकरी दिंड्या शहरात आल्यानंतर वेगवेगळ्या मंदिरांमध्ये विसावा घेत आहेत. 
शुक्रवारपासून मुस्लिम धर्मियांच्या मोहरम सणाला प्रारंभ झाला आहे. वारकऱ्यांनी ख्वाजासाहेबांच्या चौकटीवर मस्तक ठेवल्यानंतर दर्ग्याच्या अंगणात भक्तीचे रिंगण भरविले. 
मुख्य पंजांसमोर भरलेल्या भक्ती सोहळ्याने दर्ग्याच्या प्रांगणाला पंढरपूर केल्याची प्रचिती आली.  वारकऱ्यांचा उत्साह पाहून मुस्लिम तरुणांनीही सोहळ्यात भाग घेतला. हरी नामाच्या जयघोषात नागरिक दंग झाल्याचे दिसून आले. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या मिरासाहेब दर्याची महती सर्वदूर आहे.
 वारकऱ्यांच्या भक्ती रिंगणाने जात-पात आणि समाजाच्या पलिकडील भक्तीचा मिलाप घडवून आणला.मुळात वारकरी संप्रदायात भेदभाव नाही. जात-पात नाही. म्हणूनच तुकाराम महाराजांनी अल्ला करे सो होय बाबा करतारका शिरताज, गाऊ बहरे तिस चलावे यारी बाधो न सात, या अभंगातून देवइच्छेची शक्ती प्रकट केली आहे.
अल्लाने ठरवलं तर कोणीही या विश्व निर्मात्याचा मुकुट होईल. गाय आणि वासरु वाघाचे मित्र होतील. त्या अल्लाची आठवण ठेवा जो सर्वांच्या हृदयात वास करतो, असे तुकाराम महाराजांनी अभंगात म्हणटले आहे.
Advertisement
Advertisement
Tags :

.