Wari Pandharichi 2025: जाऊ देवाचिया गावा I घेऊ तेथेच विसावा, सकल संताचे माहेर पंंढरपूर!
देव सुद्धा झाडांच्या रूपाने जिथे राहतात, ते पंढरपूर सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये श्रेष्ठ आहे.
By : मीरा उत्पात
ताशी : सकल संतांचे माहेर पंढरपूर !!
कारण त्यांची विठाई माऊली तिथे त्यांच्यासाठी अठ्ठावीस युगे उभी आहे. या तीर्थक्षेत्राचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पंढरपूरला ‘तीर्थराज’ म्हणतात. एकदा कार्तिक स्वामी ऋषीगणांसह कैलासावर येतात आणि भगवान शंकराला विचारतात की ‘सर्वात श्रेष्ठ तीर्थक्षेत्र कोणते? कारण ज्या ज्या तीर्थक्षेत्रांचा विचार करावा त्या त्या क्षेत्री काही ना काही न्यून आहे.
तेव्हा हे महादेवा आता निर्दोष व सर्वश्रेष्ठ तीर्थ कोणतं?“ तेव्हा भगवान शंकर म्हणतात, ‘सकाळ-संध्याकाळ मी आणि पार्वती ज्याचे नाम जपतो. देव सुद्धा झाडांच्या रूपाने जिथे राहतात, ते पंढरपूर सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये श्रेष्ठ आहे. ‘रोज माध्यान्ही सगळी तीर्थस्थाने चंद्रभागेमध्ये सुस्नात होऊन, विठ्ठलाचे चरणस्पर्श करतात.
असं हे ‘तीर्थराज’ पंढरपूर !! तिथे ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ असा आनंद कंद परमात्मा पांडुरंग भक्तांसाठी गेली हजारो वर्षे त्यांची वाट पाहात उभा आहे. ऋषी, मुनी, संत महात्मे, तुमच्या आमच्या सारखी साधी माणसे, नित्य वारी करणारे वारकरी यांच्यापासून ते देशी विदेशी संशोधक, भक्तांपर्यंत साऱ्यांना या विठ्ठलाने वेड लावलं आहे.
विठ्ठल आणि वारी हे वरचेवर अतिशय लोकप्रिय होत आहे. या लोकप्रियतेचं कारण काय असावे, असा विचार करताना असे लक्षात येते की त्याच्या कमालीच्या ‘साधेपणा’वर सारे मोहीत झाले आहेत. देव अगदी तुमच्या माझ्या इतका साधा आहे. तो आपण रांधलेलं आवडीने खातो.
त्याला पंचपक्वान्ने लागत नाहीत. शिवाय आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लगेच धावून येतो. आपल्याला मदत करतो. कुठलंही काम करतो. त्याला सोवळं ओवळं नाही. कर्मकांड नाही. काही दिलं नाही तरी कोपत नाही. असा आपला साधाभोळा विठ्ठल !!
श्रीविठ्ठलाचा उगम झाला तेव्हा समाजात सोवळे ओवळेपणाचं नको इतकं स्तोम होतं. कर्मकांडांमध्ये समाज रुतला होता. भक्ती कर्मकांडाच्या विळख्यात सापडली होती. धर्म एक असून सुद्धा पंथापंथात भेद पडले होते. त्यातून परकियांची आक्रमणे सुरू झाली होती. त्यामुळे समाज दिशाहीन झाला होता.
समाजामध्ये एकसंधपणा आणण्याची, श्रद्धा, विश्वास जोपासण्याची गरज होती. आणि मग साकार झाले एक सगुण सुंदर रूप... सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया... आणि वारीची परंपरा निर्माण झाली. जाती पातीतले देवा-पंथातले भेद नष्ट झाले. सारे समतेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आले. आणि पंढरपूरची वाट चालू लागले. विठ्ठलावर नितांत श्रद्धा, मुखामध्ये नाम आणि शुद्ध आचार ही त्रिसूत्री वारीचा पाया झाली आणि विठ्ठल प्रेमाची बुलंद इमारत उभी राहिली.
आळंदीपासून शेकडो मैलांचा प्रवास करत ऊन वारा पाऊस झेलत वारकरी पंढरपूरला येतात. आणि सुखाचे हे सुख श्रीहरी मुख पाहून जन्माचे सार्थक करतात. इतकी निर्मळ वारी! या वारीला साऱ्यांनी नाचत, अभंग म्हणत, नामस्मरण करत पंढरपुरी जावं. आसुसलेल्या विठूमाउलीची गळाभेट घ्यावी. त्यालाच साकडं घालावं...
जाऊ देवाचिया गावा । घेऊ तेथेच विसावा ।।
देवा सांगू सुख दु:ख । देव निवारील भूक ।।
घालू देवासीच भार । देव सुखाचा सागर ।।
राहू जवळी देवापाशी । आता जडोनि पायाशी ।।
तुका म्हणे आम्ही बाळे ।