Vari Pandharichi 2025: वारी म्हणजे एक अवर्णनीय सोहळा असं का म्हंटल जातं?
प्रतिवर्षी एक तरी वारी करणे असा या वारकरी संप्रदायाचा नियम आहे
Vari Pandharichi 2025: पंढरीची वारी म्हणजे एक अवर्णनीय सोहळा असतो. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि सामुदायिकरित्या दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे ही वारकरी मंडळी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, संत एकनाथ, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ अशा संतांच्या पालख्या घेऊन विठ्ठलाला भेटण्यासाठी जातात. प्रतिवर्षी एक तरी वारी करणे असा या वारकरी संप्रदायाचा नियम आहे. वारी या शब्दाचा अर्थ नेहमीच फेरी, व्रत येरझऱ्या असा दिला जातो.
आषाढी व्यतिरिक्त इतरही वाऱ्या
सर्वच वारकरी आषाढी वारीला पंढरपूरला येतातच असे नाही. ते चैत्री वारी, माघ वारी, कार्तिक वारी अशा वेगवेगळ्या वाऱ्यांना येतात. वारकरी हा मुख्यत्त्वे शेतकरी आहे. शेतीचा हंगाम सांभाळून तो वारीला येतो. त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, कोकण, गोवा येथील वारकरी आपला कामाचा हंगाम सांभाळून वारीला येतो.
कालानुरूप पंढरपूर शहरदेखील वाढते आहे. पंढरपूर शहराच्या लगत सुमारे 10 किलोमीटरचा नवीन विकास आराखडा तयार होत आहे. चंद्रभागेच्या पलिकडच्या गावांमध्येही वारकरी मठाला वगैरे जागा घेत आहेत.
आषाढी एकादशीच्या आधी आषाढ शु. दशमीला किंवा त्याआधी पंढरपूरला पोचता येईल अशा बेताने वारकरी दिंडीने चालत पंढरपूरला जातात. एका दिंडीत एक विणेकरी, अनेक टाळकरी, पताकावाले, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, पाण्याचा हंडा घेतलेले आणि मोकळे चालणाऱ्यांचा समावेश असतो.
संत तुकारामांच्या पश्चात त्यांचे कनिष्ठ चिरंजीव नारायण बाबा यांनी संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवून, ती पालखी आळंदीला नेवून, त्यात ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवून ही जोड पालखी पंढरपूरला नेण्याची पध्दत सुरु केली. अशा रितीने पायी वारीचे रुपांतर पालखी सोहळ्यात झाले.
पुढे काही कारणांनी ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्या वेगळ्या झाल्या. अन्य संतांच्या समाधी स्थानापासून सुध्दा पालखी सोहळे सुरु झाले. या सर्व पालख्या आषाढ शु. दशमीला पंढरीत प्रवेश करतात. आषाढी एकादशीला पंढरीत चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा, कीर्तन ऐकणे वगैरे विधी करतात.