Vari Pandharichi 2025: आषाढी वारीची सांगता करणारा महाद्वार काला, काय आहे परंपरा?
पंढरपुरातील हरिदास घराण्यात महाद्वार काला करण्याची परंपरा आहे
By : चैतन्य उत्पात
पंढरपूर : केवळ मंदिरातच श्री विठुरायाचे अस्तित्व नसून तीर्थक्षेत्र पंढरीत अनेक ठिकाणी देवाने भक्तांवर कृपा केल्याच्या खुणा पाहावयास मिळतात. यापैकी एक म्हणून महाद्वार काल्याचा उल्लेख करावा लागेल. आषाढी आणि कार्तिकीला पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेस महाद्वार काला साजरा होतो. वारीची सांगता या उत्सवाने होते.
पंढरपुरातील हरिदास घराण्यात महाद्वार काला करण्याची परंपरा आहे. या घराण्यात जवळपास 400 वर्षांपूर्वी संत पांडुरंग महाराज हे सत्पुरुष होऊन गेले. त्यांना विठुरायाने दर्शन देऊन आपल्या पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या. 70 वर्षाहून अधिक वय झाले असताना ते वैशाख महिन्यात चंद्रभागेच्या स्नानाला निघाले होते.
अनवाणी असल्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात ते बेशुद्ध पडले. त्यावेळी विठुरायाने त्यांच्या मस्तकाजवळ खडावा ठेवल्या. महाराज शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी हा प्रसाद मस्तकी लावला. मात्र विठुराया जोपर्यंत प्रत्यक्ष दर्शन देत नाही तोपर्यंत येथेच बसून राहणार असा इशाराच दिला.
श्री विठ्ठलाने महाराजांना सगुण रूपात दर्शन दिले. यावेळी देवाने त्यांना दिलेल्या प्रसाद रुपी खडावा मस्तकी धारण करून महाद्वार काल्याचा उत्सव करावा असा आदेश दिला. मागील 10 पिढ्यापासून ही परंपरा हरिदास घराण्यात सुरू आहे. संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांची दिंडी हरिदास यांच्या काल्याच्या वाड्यात आल्यानंतर या उत्सवाला सुरुवात होते.
परंपरेनुसार मदन महाराज यांच्या मस्तकावर या पादुका शंभर फूट पागोट्याने पुजारी बांधतात. या खडावा मस्तकावर ठेवताच महाराजांना समाधी अवस्था प्राप्त होते. यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाराजांना खांद्यावर घेऊन पाच प्रदक्षिणा होतात आणि त्यानंतर दहीहंडी फुटते. त्यानंतर महाराजांना खांद्यावरच घेऊन संत नामदेव पायरी येथून उतरून महाद्वार घाटावरून चंद्रभागेचे वाळवंट तेथून कुंभार घाटावरून माहेश्वरी धर्मशाळेत दहीहंडी फुटते.
यानंतर आराध्ये गल्ली, हरिदास वेस मार्गे पुन्हा हा उत्सव काल्याच्या वाड्यात दाखल होतो. या संपूर्ण दोन तासात मदन महाराज यांना खांद्यावर घेतात. दही दूध आणि लाह्यापासून बनवलेला काल्याचा प्रसाद हजारो भाविकांना वाटला जातो. महाद्वार काल्यानेच आषाढी आणि कार्तिकी यात्रेची सांगता होते.