Mahapalika Election 2025: मनपा प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात, 12 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होणार
नगरविकास विभाग राज्य निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचना सादर करतील
कोल्हापूर : महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून मनपा प्रशासन 12 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रारुप प्रभाग रचना सादर करतील. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध होणार आहे.
महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून पहिल्या टप्प्यात प्रारुप प्रभाग रचनेचे काम सुरु झाले आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे, गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे आणि नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागांच्या हद्दी जागेवर जाऊन तपासणे आदी कामे पूर्ण झाली आहेत.
महापालिका प्रशासनाकडून 12 ऑगस्ट रोजी प्रारुप प्रभाग रचना जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर जिल्हाधिकारी ही प्रारुप प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे सादर करतील. तर नगरविकास विभाग राज्य निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचना सादर करतील.
राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर ३ सप्टेंबर रोजी प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येईल. यानंतर प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती घेण्यात येतील. हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर पुन्हा प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाईल. ऑक्टोबर २०२५ मध्ये अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
शहरात एकूण २० प्रभाग
महापालिकेत यापूर्वी एक सदस्यीय प्रभाग रचना होती. त्यानुसार शहरात ८१ प्रभाग होते. मात्र आत्ताच्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. चार सदस्यीय रचनेनुसार महापालिका निवडणुकीत शहरात एकूण २० प्रभाग असणार आहेत.
एक प्रभाग पाच सदस्यांचा
चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांचे १९ प्रभाग असणार आहेत. तर एक प्रभाग हा पाच सदस्यांचा असणार आहे. पाच सदस्यांचा प्रभाग कोणता होणार हे अद्याप निश्चित नाही. २० पैकी कोणताही एक प्रभाग पाच सदस्यांचा होणार आहे. अंतिम २० वा प्रभाग पाच सदस्यीय होण्याची शक्यता आहे.
३० हजार मतदारांचा एक प्रभाग
२०११ ची जनगणना ग्राह्य धरुन प्रभाग रचना करण्यात आली आहे. मात्र २०११ नंतर लोकसंख्या वाढली असून मतदारसंख्याही वाढली आहे. त्यामुळे २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना होणार असली तरी मतदारांची संख्या मात्र वाढणार आहे.
शहराच्या मूळ गावठाण भागातील प्रभाग हे साधारणतः २७ ते ३० हजार मतदारसंख्येचे असणार आहेत. तर उपनगरातील एक प्रभाग सुमारे ३५ हजार मतदारसंख्येचा असण्याची शक्यता आहे. तर उपनगरातील एक प्रभाग पाच सदस्यीय झाल्यास हा प्रभाग ४५ ते ५० हजार मतदारसंख्येचा असणार आहे.