मळणी सुरु असलेल्या शेतात सोडले कालव्याचे पाणी; पाटबंधारे विभागाच्या कारभाराने शेतकऱ्याचे मोठे नुकसान
मणदूर- शिराळा
वारणा धरणाच्या पाटबंधारे विभागाने कालव्याचे पाणी भाताची मळणी सुरु असलेल्या शेतात सोडल्याने हातातोंडाशा आलेल्या अन्नधान्याचे आणि भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. पाटबंधारे विभागाच्या या कारभाराने मळणी सुरू असलेला शेतकरी अडचणीत आला असून त्याची नुकसान भरपाई पाटबंधारे विभाग करून देणार आहे काय असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.
वारणा पाटबंधारे विभागाने कालव्यातून पाणी सोडले आहे त्यामुळे, मणदूर, सोनवडे, आरळा आणि परिसरातील कालव्याच्या बाजूची भातशेती मध्ये पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळाचे सावट असलेला शेतकरी या प्रकारामुळे अधिकच अडचणीत सापडला आहे. पाटबंधारे विभागाने कोणतीही पूर्व- सूचना न देता पाणी सोडल्याने कापणी करून शेतात टाकलेल्या भाताच्या पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. पीक पाण्यात गेले आहे,त्याचबरोबर काढणीसाठी आलेल्या उभ्या पिकात पाणी शिरल्यामुळे शेतात जानेही अवघड झाल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. सदरच्या शेतकऱ्याच्या नुकसानीस जबाबदार कोण? असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.
या घटनेमुळे हातातोंडांशी आलेलं भातपीक वाया गेल्यामुळे अडचणीत असलेला बळीराजा अधिकच अडचणीत सापडला आहे. याची नुकसानभरपाई मिळावी अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. याबाबत वारणा पाटबंधारे चे अधिकारी गोरख पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, कडक उन्ह पडल्याने, शेतकऱ्यांच्या मागणी नुसार पाणी सोडले असून किमान पुढील दहा दिवस तरी पाणी सुरु राहणार असल्याचे सांगितले.