पाकिस्तान अन् तालिबानदरम्यान युद्धसदृश स्थिती
पाकिस्तानचा हवाईहल्ला : अफगाण सैन्याकडून भीषण प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ काबुल
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या तालिबानी सैन्यादरम्यान आता युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या वायुदलाने रविवारी रात्री उशिरा तहरीक-ए-तालिबान किंवा टीटीपीवर हवाई हल्ले केले तसेच अफगाणिस्तानात शिरून कारवाई केली आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल तालिबानी सैनिकांनी डूरंड रेषेवरून जोरदार हल्ला केला आहे. तसेच अवजड शस्त्रसामग्रीच्या मदतीने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांना लक्ष्य केले आहे.
हवाई हल्ल्याद्वारे टीटीपीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा पाकिस्ताने केला होता. तर पाकिस्तानच्या वायुदलाच्या हल्ल्यानंतर तालिबानने स्वत:च्या सैन्याला प्रत्युत्तराच्या हल्ल्याचा आदेश दिला आहे.
तालिबानी सैनिक आता पाकिस्तानातील नागरी वस्तींना लक्ष्य करत आहेत. कुर्रम कबायली जिल्हे, उत्तर वजीरिस्तान आणि दक्षिण वजीरिस्तानमधून तालिबानी सैनिकानी तोफांच्या मदतीने हल्ले केले आहेत. तालिबानच्या या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जात असल्याचे पाकिस्तानचे सांगणे आहे.
पाकिस्तानला परिणाम भोगावे लागणार
अफगाणिस्तानात पाकिस्तानकडून हवाई हल्ले करण्यात आल्याचे तालिबानी प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी मान्य केले आहे. हे हल्ले खोस्त आणि पाकटीका भागात झाले आहेत. पाकिस्तानला या हवाई हल्ल्यांचे भीषण परिणाम भोगावे लागणार आहेत. अफगाणिस्तानच्या भूमीवरून कुणालाही दहशतवादी कारवाया करू देणार नाही. टीटीपीचे दहशतवादी अफगाणिस्तानातून हल्ले करत नसल्याचा दावा तालिबानने केला आहे.
यापूर्वी टीटीपी दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याचे 7 सैनिक आणि अधिकाऱ्यांना ठार केले होते. दहशतवादी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानात हल्ले करण्यासाठी करत असल्याचा आरोप पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केला होता. पाकचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या हल्ल्याचा सूड उगविला जाणार असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतर पाकिस्तानकडून हवाई हल्ले करण्यात आले आहेत.
अब्दुल्ला शाह जिवंत
पाकिस्तानने हवाई हल्ल्यात टीटीपीचा टॉप कमांडर अब्दुल्ला शाह मारला गेल्याचा दावा केला होता. परंतु टीटीपीने कमांडर शाह जिवंत असल्याचे म्हटले आहे. हवाई हल्ल्यात पाकिस्तानी शरणार्थींच्या घरांचेच नुकसान झाले आहे. या शरणार्थींनी अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागांमध्ये आश्रय घेतला आहे. या हल्ल्यात महिला आणि मुलांचा मृत्यू झाला आहे. टीटीपीचे सदस्य पाकिस्तानातच आहेत. कमांडर शाह हा सध्या पाकिस्तानात असल्याचा दावा टीटीपीकडून करण्यात आला.