ब्रिटनमधील सर्वात छोटे घर
टॉयलेट तसेच बाथरुम नाही, दरवाजातून आत शिरणेही अवघड
तुम्ही अनेक आलिशान घरे पाहिली असतील. या घरांची टूर घडविली जाते, तेव्हा प्रत्येक गोष्टीवर आपली नजर खिळत असते. परंतु एक घर याच्या उलट आहे. या घरात शिरण्यासाठीच तुम्हाला कसरत करावी लागते.
घर हे आरामात राहता येईल असे ठिकाण असते. अत्यंत मोठे नाही परंतु सहजपणे ये-जा करता येऊ शकेल इतपत तरी घर असणे आवश्यक आहे. परंतु एक घर हे कोंबड्यांच्या खुराड्यासारखेच आहे. हे घर ब्रिटनमध्ये असून तेथील सर्वात छोटे घर म्हणून याला ओळखले जाते.
नॉर्थ वेल्सच्या कॉन्वीमध्ये निर्माण करण्यात आलेल्या या घराची फ्लोर स्पेस केवळ 1 फूट गुणिले 5.9 फूट आहे. तुम्ही या घराला एका मीडियम साइजच्या कारइतके मानू शकता. घराच्या आत जाण्यासाठी असलेला दरवाजा पाहता त्यातून केवळ 5 फूट 2 इंचाचा इसम सहजपणे आत जाऊ शकते. एखाद्याची त्याहून अधिक उंची असेल तर त्याला आत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. घरात फायरप्लेस, स्टोव्ह आणि वर निर्माण करण्यात आलेल्या सिंगल बेड असलेल्या बेडरुमसाठी जिना आहे. याचबरोबर घरात टॉयलेट-बाथरुम नाही तसेच किचन देखील नाही. टीव्हीसाठी देखील घरात जागा नाही. या घराला 1891 मध्ये केवळ 2 हजार रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले होते.
सध्या या घराची मालकी जेन यांच्याकडे आहे. त्यांच्या आजोबांनी हे घर खरेदी केले होते. या घराला एका रात्रीत तयार करण्यात आल्याचे मानले जाते. नियमानुसार रात्री निर्माण करण्यात आलेल्या घराच्या चिमणीतून सकाळी धूर निघताना दिसून आला तर त्या भूखंडावर दावा केला जाऊ शकतो. या घरात अनेक लोक राहून गेले आहेत. येथे राहणारा अखेरचा इसम मच्छिमार होता, जो 6 फूटांहून अधिक उंच होता. आश्चर्याची बाब म्हणजे येथे 6 जणांचे कुटुंबही राहून गेले आहे. ज्यात आईवडिल आणि 4 मुलांचा समावेश होता असे जेन यांनी सांगितले. देशातील हे सर्वात छोटे घर असल्याचे कळल्यापासून पर्यटक येथे येऊ लागले आहेत.