महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युद्ध निर्णायक वळणावर ?

06:30 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मध्यपूर्वेत इस्रायल-हमास युद्धास प्रारंभ होऊन आता जवळपास सहा आठवड्यांचा कालावधी होत आहे. इस्रायलने गाझा पट्टीच्या उत्तर भागावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळविल्याचे दिसत असून हमास या दहशतवादी संघटनेचे अनेक तळ उध्वस्त केल्याचीही वृत्ते धडकत आहेत. गाझापट्टीत मृतांची संख्याही वाढून 12,000 हून अधिक झाली आहे. हमास दहशतवाद्यांचे मुख्यालय मानल्या गेलेल्या शिफा रुग्णालयात प्रवेश करुन इस्रायलने बराच मोठा पल्ला गाठल्याचेही पहावयास मिळत आहे. एकंदरीत, इस्रायलची सरशी होताना दिसत असून त्याच्या अवतीभोवतीचे मुस्लीम देश इस्रायलविरोधात जहाल भाषेत पत्रके काढण्यावाचून, किंवा बैठका घेऊन निषेध व्यक्त करण्यापलीकडे फारसे काही करत नाहीत. एकंदर, इस्रायलवर निर्घृण हल्ला करुन त्याला काहीकाळ बचावात्मक पवित्रा घेण्याचे अल्पजीवी समाधान मिळविण्यापलीकडे हमासने काहीही कमावले तर नाहीच, उलट बरेच काही गमावल्याचेच स्पष्ट होत आहे. हे युद्ध आता कदाचित त्याच्या निर्णायक वळणावर आल्याचेही मत व्यक्त होत आहे. इस्रायलने आपला प्रतिवार बऱ्याच संयमाने आणि आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत जास्तीत जास्त प्रमाणात राहून केलेला आहे. गाझा पट्टीत झालेल्या जीवीतहानीसंबंधी आपल्याकडे बऱ्याच कथित मानवतावाद्यांनी आक्षेप घेतला. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात काहूर उठविले. एका राष्ट्रप्रमुखाने ‘गावगुंडा’सारखे वागू नये, असा शहाजोग, साळसूद आणि तितकाच पोकळ उपदेशही (येथे बसून) केला. पण मानवी मूल्यांचा आगंतुक कैवार घेतलेल्या या मंडळींनी आजही हमासचा निषेध करण्याचे साधे सौजन्यही दाखविलेले नाही. इस्रायलने खरोखरच ‘गावगुंडगिरी’ करण्याचे ठरविले असते, तर जीवित हानी आता झाली आहे त्याहीपेक्षा कितीतरी पटींनी अधिक झाली असती. त्यामुळे त्या देशाच्या विरोधात करण्यात येणारे, केलेले हे एकांगी वाक्ताडन केवळ परोपदेशे पांडित्य ठरते. वास्तविक या सर्व उत्पातासाठी, निरपराध्यांच्या जीवीतहानीसाठी आणि मालमत्तेच्या विनाशासाठी हमास ही संघटना सर्वस्वी जबाबदार आहे. ही संघटना इस्रायलवर विनाकारण हल्ला करती ना, तर तिचाच आणि तिच्यासह पॅलेस्टाईनच्या नागरिकांचा असा विनाश होता ना. कारण इस्रायलने प्रथम हल्ला केला नव्हता. पण हे सत्य पद्धतशीरपणे दडविण्यात येत आहे. पॅलेस्टाईनी लोकांच्या शिरकाणासंदर्भात काही दशकांपूर्वीच घडलेला इतिहास पुष्कळ कथित मानवतावाद्यांच्याही लक्षात नाही, किंवा असूनही तो दडविला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. इस्रायलशेजारच्या जॉर्डन या देशाने साधारणत: 40,000 पॅलेस्टाईनींना सत्तरच्या दशकात आपल्या देशात आश्रय दिला होता. तथापि या पॅलेस्टाईनींनी तेथे शांतपणे न राहता, जॉर्डनच्या राजाचीच सत्ता उखडण्याचा, तसेच तो देश ताब्यात घेण्यासाठी उठाव करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी जॉर्डनच्या राजाने पाकिस्तानचे लष्कर बोलावून या पॅलेस्टाईनींचे अक्षरश: शिरकाण केले होते. त्या सरकारी हिंसाचारात 25 हजार ते 35 हजार पॅलेस्टाईनींना ठार करण्यात आले होते. त्यात असंख्य निरपराध पॅलेस्टाईनीही होते. या शिरकाणाचे नेतृत्व पाकिस्तानचे दिवंगत लष्करशहा मोहम्मद झिया उल हक यांनी केले होते. त्यामानाने इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत झालेला हिंसाचार कमीच म्हणावा लागेल. खरे तर पॅलेस्टाईनी लोक आणि जॉर्डनचा राजा हे एकाच धर्माचे होते. तरीही त्याला उलथविण्याचे कारस्थान रचले गेले आणि त्या राजाने ते स्वधर्मीयांचाच भीषण रक्तपात घडवून हाणून पाडले. तथापि, लोकांचा बुद्धीभ्रम करणे हेच काही कथित मानवतावाद्यांचे ध्येय असल्याने त्या भूभागासंदर्भात सर्व सत्य मांडले जात नाही. ज्यू लोकांनी पॅलेस्टाईनची भूमी हिसकावली, असाही एक संभ्रम पसरविण्याचा उद्योग अलीकडच्या काळात केला जात आहे. परंतु, हा अपप्रचार आहे. यासंबंधी अलीकडच्या इतिहासात डोकावले असता अशी अधिकृत माहिती मिळते, की, पहिल्या महायुद्धात ब्रिटीश आणि फ्रेंचांनी तुर्कस्थानच्या ओटोमान या साम्राज्याचा पराभव केला. त्यावेळी सध्याच्या मध्यपूर्वेतील अनेक राष्ट्रे, म्हणजे सौदी अरेबिया, इराक, सिरीया, जॉर्डन, लेबेनॉन, कुवेत, संयुक्त अरब अमिराती, ओमान, कतार आणि पॅलेस्टाईन हा सर्व भूभाग या ओटोमान सम्राज्याचा भाग होता. तो ब्रिटीश आणि फ्रेंचांनी जिंकून घेतला आणि त्याची वाटणी केली. त्यातून वेगवेगळे देश जन्माला आले. त्यानंतर पॅलेस्टाईन हा भाग ब्रिटीशांची वसाहत बनला. ज्या प्रमाणे ब्रिटीशांनी भारतीय राजांचा पराभव करुन भारत ताब्यात घेतला होता, आणि भारताला आपली वसाहत बनविले होते, तसाच प्रकार पॅलेस्टाईनसंदर्भातही घडला होता. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीशांनी पॅलेस्टाईन ही वसाहत सोडली आणि सोडताना या भूभागाचा काही भाग तेथे प्रारंभापासून वसलेल्या ज्यूंना दिला आणि काही भाग अरबांना तिला. अशा प्रकारे ज्यूंचे राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्रायलची निर्मिती झाली आहे. भारताचीही फाळणी त्याच काळात ब्रिटीशांनी थोड्याफार फरकाने अशाच प्रकारे केली होती. यावरुन हे स्पष्ट होते, की, ज्यूंनी सध्याची इस्रायल ही भूमी बळकाविलेली नाही, तर ती त्यांना त्यावेळच्या ब्रिटीश सत्ताधीशांनी दिली आहे. कालांतराने जगभरातून ज्यू लोक या देशात आले आणि त्यांनी कष्टाने आणि वैज्ञानिकतेच्या आधाराने या वाळवंटी उजाड भूमीची आश्चर्यकारक प्रगती केली. तथापि, अवतीभोवतीच्या अरब राष्ट्रांना इस्रायलचे अस्तित्व सहन न झाल्याने त्यांनी या देशाच्या स्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासून त्याला युद्धात लोटले आहे आणि आजही सातत्याने हल्ले करुन त्याचे अस्तित्व मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रत्येक युद्धात इस्रायलचा विजय झाला असून त्याने प्रत्येक युद्धानंतर आपली भूमी वाढविली आहे. इस्रायलला युद्धात ओढण्यात आले नसते तर त्याने आपली भूमी वाढविलीही नसती, असे म्हणावयास निश्चित जागा आहे. तेव्हा सूज्ञांनी हा घटनाक्रम लक्षात घ्यावा असा आहे. तथापि, तो दडविण्यात आणि इस्रायलची बदनामी करण्यात बऱ्याच जणांना विशेष रस असल्याचे दिसते. पण त्यातून काही साध्य होणार नाही, हे उघड आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article