वाफोलीत दगड वाहतूक करणाऱ्या डंपरमधून रस्त्यावर पडले दगड
वाफोली ग्रामस्थ आक्रमक ; २ तास डंपर वाहतूक रोखली ; सावंतवाडी तहसिलदारांचे लक्ष वेधून सुद्धा प्रकार सुरूच
प्रतिनिधी
बांदा
विलवडे येथील काळ्या दगडाच्या खाणीतून काळा दगड घेऊन जाणाऱ्या डंपर मधुन दगड वाफोली सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावर पडल्याने वाफोली ग्रामस्थ आक्रमक झाले. दुपारी तब्बल दोन तास डंपर वाहतूक रोखून धरली. जोपर्यंत संबंधित डंपर मालक व चालक येत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर पडलेले दगड उचलू देणार नाही. तर डंपर वाहतूक सुद्धा ग्रामस्थांनी रोखून धरली आहे. सदर घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. डंपर मधुन मोठया प्रमाणात दगड पडले असून सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. सदर काळ्या दगडाच्या खाणीबाबत ग्रामपंचायत वाफोली यांनी लक्ष वेधून सुद्धा सावंतवाडी तहसीलदार दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला. यावेळी वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, विलास गवस, सागर कोठावळे, गुणेश गवस, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश गवस, डॉ. संजय सावळ, रंजन गवस, मंगेश सावंत, जयदीप गवस, सुनील सावंत, सचिन गवस, अर्जुन कांबळे, बापू राणे, उपस्थित होते दिवसभरात शंभरहुन अधिक गाड्या या मार्गवर चालत असतात हे सर्व धंदे नियमांची पायमल्ली करीत क्रशर मधून ओवर लोड शासनाची रॉयल्टी चोरून जात असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला.