श्रीमंत पती पाहिजे...
अलिकडच्या काळात पैशाला मोठेच महत्व प्राप्त झाले आहे. तसे पहिल्यास पूर्वीच्या काळातही ते होते. पण सध्याइतके नव्हते. ‘सर्वे गुणा: कांचनम् आश्रयंते’, या संस्कृत म्हणीचा अर्थ संपत्तीच्या आश्रयाला सर्व गुण जातात, असा आहे. त्या अर्थाने अलिकडच्या काळात पैसा हा सर्वात मोठा गुण बनला आहे. त्यासमोर इतर सर्व क्षुल्लक आहे, असे मानले जाते. लग्नाच बाजारही याला अपवाद कसा असणार ? अशीच एक घटना सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनली आहे.
विवाह ठरविण्याचे काम पूर्वी आईवडील किंवा घरातील मोठी माणसे करीत असत. आता बदलत्या काळानुसार जोडीदाराची निवड संबंधित व्यक्तींकडूनच केली जाते. याच संदर्भात सध्या कॅरोलीना गीटस् नामक युवतीची चर्चा होत आहे. तिला स्वत:साठी नवरा शोधायचा आहे. मात्र, तो खूप श्रीमंत हवा अशी तिची अट आहे. इतर अटी, म्हणजे वय, वंश, नोकरी किंवा व्यवसाय, घराणे आदी कोणत्याही नाहीत. तो श्रीमंत असायला हवा, इतकीच मागणी आहे. मात्र, त्यासाठी तिने कोणत्याही मेट्रिमोनियल साईटशी किंवा वधू-वर सूचक मंडळाशी संपर्क केलेला नाही. तिने ‘श्रीमंत नवरा पाहिजे’ असे घोषवाक्य लिहिलेला टीशर्ट परिधान करण्यास प्रारंभ केला असून हा टीशर्ट घालून ती सर्वत्र संचार करते. इतकेच नव्हे, तर तिने आपल्या या टीशर्टवर क्यूआर कोडही छपला असून त्यावर पैसे पाठविण्याचे आवाहन केले आहे. अनेक धनिकांनी तिला प्राप्त करण्याच्या हेतूने या क्युआर कोडचा उपयोग करुन तिला पैसे पाठविलेही आहेत. अद्याप तिने कोणा धनिकाला तिच्या जीवनाचा जोडीदार म्हणून निवडले आहे किंवा नाही, हे समजायला मार्ग नाही. तथापि, श्रीमंत पती शोधण्यासाठी तिने लढविलेली ही शक्कल मात्र सध्या अनेकांच्या बोलण्याचा विषय झाली आहे.
अर्थात, सर्वच लोक तिचे कौतुक करतात असे नाही. काही लोकांनी तिची ‘मॉडर्न भिकारी’ म्हणून हेटाळली केली आहे. तर बऱ्याच जणांना मते पैशासाठी तिने पैसे मिळविण्यासाठी हे कारस्थान रचले आहे, असा आरोपही केला आहे. चार दिवसांपूर्वी या युवतीने आपला टीशर्टमधील व्हिडीओ प्रसिद्ध केला. तो आजवर 75 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून उलटसुलट मते व्यक्त केली आहेत.