कन्येची समजूत घालण्यासाठी...
आपल्या अपत्यांवर कोणत्याही मातापित्यांचे निरतिशय प्रेम असते, ही बाब सर्वमान्य आहे. आपल्या अपत्यांची कोणत्याही प्रकारची नाराजी पोटात घालून त्यांना समाधानी ठेवणे हे आईबाप आपले कर्तव्यच मानतात. या अपत्यप्रेमाला स्थळ, काळ आणि देश यांचे कोणतेही बंधन नाही. ही सार्वत्रिक भावना आहे.
अशीच एक घटना चीनमध्ये घडली आहे. चीनच्या दक्षिण भागातील गुआंगडोंग प्रांताच्या गुआंगजाऊ येथे ती घडली आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणीचे तिच्या पित्याशी काही कारणावरुन भांडण झाले होते आणि ती रागाच्या भरात घराबाहेर पडली होती. आपल्या पित्याच्या घरापासून बऱ्याच दूरवरच्या शहरात ती गेली. तेथे तिने नोकरी मिळविली आणि तेथेच राहू लागली. पुन्हा पित्याच्या घरी जायचे नाही, असा निश्चय तिने केला. मात्र, इकडे कन्येचा विरह पित्याला सहन होईना. ती कोठे गेली आहे, हेही त्याला कळेना. तसेच मोबाईलवरुनही तिच्याशी संपर्क साधता येईना. अशा स्थितीत तिला शोधण्याचा आणि तिची समजूत घालण्याचा निश्चय त्याने केला आणि त्यानुसार प्रयत्नांना प्रारंभ केला. ती त्याच्या घरापासून 1000 किलोमीटर दूरवर असल्याचे त्याला समजल्यानंतर तो तेथे गेला.
ही तरुणी तिच्या कार्यालयात काम करीत होती. तिच्याजवळ अचानक एक टेडी बिअर चालत आले आणि त्याने तिच्या हातात फूल दिले. साहजिकच ती दचकली. नंतर तिला टेडी बिअरचा चेहरा दिसला जो तिच्या पित्याचा होता. बालपणी या तरुणीला टेडीबिअर आवडत असत. त्यामुळे तिची समजूत घालण्यासाठी पित्याने टेडीबिअरच्याच वेषभूषेत तिची भेट घेतली होती. हे पाहून तिच्याही भावना उचंबळून आल्या आणि मतभेद विसरुन पुन्हा त्यांचे मनोमीलन झाले.