For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घराची भिंत कोसळून माता, पुत्राचा अंत

12:11 PM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
घराची भिंत कोसळून माता  पुत्राचा अंत
Advertisement

मंडूर-नेवरा येथील ह्य्दयद्रावक घटना : रविवारी भिंत कोसळून तीन मृत्युमुखी,यंदाच्या पावसाचे आतापर्यंत पाच बळी

Advertisement

पणजी : तिसवाडी तालुक्यातील नेवरा मंडूर पंचायत क्षेत्रात एका घराची भिंत कोसळून आई आणि मुलगा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना काल सोमवारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे मंडूर, आजोशी, नेवरा, डोंगरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेल्या मातेचे नाव मॅरी रॉड्रिग्स (70 वर्षे) तर तिच्या मयत मुलाचे नाव आल्फ्रेड रॉड्रिग्ज असे आहे. काही दिवसांपूर्वी या घराची एक भिंत पडली होती. पावसाचे दिवस असल्याने दुरुस्तीकाम करायला मिळाले नव्हते. तशाच स्थितीत आई आणि मुलगा घरात राहत होते. रविवारी लागलेल्या मुसळधार पावसामुळे भिंत काही प्रमाणात भिजली होती. तशातच जोडून असलेली दुसरी भिंत अगोदर पडल्यामुळे भिंतीचा आधार गेला होता. सोमवारी दुपारी जेवण केल्यानंतर आराम करत असता दुसरी भिंत कोसळली, त्यात आई आणि मुलगा सापडला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत आगशी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. दोन्ही मृतदेह गोमेकॉत पाठविले आहेत. मंडूरची ही घटना धरुन गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे भिंती कोसळण्याच्या दोन घटना घडल्या. त्यामुळे यंदाच्या पावसात आतापर्यंत पाच बळी गेले आहेत.

रॉड्रिग्ज कुटुंबाला सरकारने घर बांधून द्यावे : वाघ

Advertisement

समाजकार्यकर्ते तथा प्राध्यापक रामराव वाघ यांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील दृष्य पाहून ते हादरुन गेले. त्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले की, ही घटना अत्यंत दु:खदायक आहे. एकाच घटनेत माता व पुत्राला असा मृत्यू यावा, हा संपूर्ण कुटुंबासाठी मोठा धक्का आहे. कुटुंबाचे कधीही भरुन न येणारे दु:ख झाल्याने आपणासही अतीव यातना होत आहेत. त्यांना सरकारकडून मदत व पाठिंबा मिळायला हवा. आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारला विनंती करत आहे की, सरकारने या कुटुंबाला घर बांधून द्यावे आणि या कुटुंबाला दिलासा द्यावा, असेही वाघ यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.