जागतिक हृदयदिनानिमित्त अरिहंत हॉस्पिटलच्यावतीने वॉकेथॉन
बेळगाव : शहरातील अरिहंत हॉस्पिटलच्यावतीने जागतिक हृदयदिनानिमित्त चन्नम्मा सर्कल ते नेहरूनगरपर्यंत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग व बिम्सचे सीईओ सिद्दू हुल्लोळी उपस्थित होते. त्यांनी वॉकेथॉनमध्ये सहभाग घेऊन उपस्थितांना प्रोत्साहन दिले. या वॉकेथॉनमध्ये डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, मॉर्निंग वॉकर्स, विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमात प्रतिबंधात्मक काळजी, हृदय व निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यासोबतच हृदयाच्या आरोग्याबाबत जागरुकता करण्यात आली. हॉस्पिटलच्यावतीने आयोजित वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांचे आभार मानत डॉ. एम. डी. दीक्षित यांनी यावर्षीच्या जागतिक हृदयदिनाची थिम ‘अॅक्शन फॉर हार्ट’चे महत्त्व स्पष्ट केले. हा दिवस साजरा करण्याचा दिवस नसून हृदयविकार रोखण्यासाठी कृती करण्याचा दिवस आहे. आपले हृदय आपणच जपले पाहिजे, यासाठी निरोगी जीवनाला महत्त्व दिले पाहिजे. नागरिकांनी जंकफूड सोडून दररोज किमान 30 मिनिटे चालणे असा बदल दिनक्रमात करणे गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी दिला. संचालक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांनीही हृदयदिनाच्या शुभेच्छा देत नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. प्रभू हलकट्टी, डॉ. लोकनाथ मदगन्नावर, डॉ. वरदराज गोकाक, डॉ. अंबरीश नेर्लीकर, डॉ. सूरज पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ. संजीव राठोड, डॉ. निखिल दीक्षित यांच्यासह डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, मॉर्निंग वॉकर्स, विद्यार्थी व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.