सगळ्या ऋतूंचा ‘वक्खा, विक्खी, वुक्खू’...
पावसाने निरोप घ्यावा अन् खरेदीसह दिवाळीचा आनंद घेऊ द्यावा, अशी नागरिकांची प्रार्थना
बेळगाव : ‘पावसाळ्याने उन्हाळ्याबरोबर हिवाळ्याशीही युती करून महापावसाळी आघाडी स्थापन करून, ‘थंडीला’ बहुमत असूनही सत्तेबाहेर केले आहे. सगळ्या ऋतूंचा ‘वक्खा, विक्खि वुक्खू’ झाला आहे...’
ऑक्टोबर संपून नोव्हेंबर उजाडला तरी यंदा ऑक्टोबर हिट जाणवलीच नाही. कारण पावसाळ्याने आपले बस्तान सोडलेलेच नाही. परतीचा पाऊस, परतीची वाट धरतो की नाही, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पावसाने बळीराजाला तर संकटातच ढकलले आहे. हातातोंडाशी आलेले पीक त्याने हिरावून घेऊ नये म्हणून बळीराजा प्रार्थना करीत आहे, पण पाऊस काही जुमानत नाही. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे मिम्स झाले नसतील तरच नवल. वरील मिम्स हे त्याच प्रकारचे. सर्वांनी मिळून थंडीला सत्तेतून बाहेर काढले आहे, यातून बरेच काही सूचित होते. सूज्ञास सांगणे न लगे. दिवाळीच्या दिवसातही पाऊस आल्याने आकाशकंदील टांगायचे कसे? हा प्रश्न आहेच.
त्यामुळेच आणखी एक मार्मिक मिम तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये बाजारपेठेत एक व्यक्ती आकाशकंदील घेण्यासाठी जाते, विक्रेता त्याला वेगवेगळे दर सांगतो, मात्र, छत्रीच्या आत असलेला कंदीलही विक्रेत्याकडे उपलब्ध आहे. ग्राहक त्याला हे काय आहे? विचारता, विक्रेता सांगतो हे नवीन आहे, अगोदर हिवाळा, उन्हाळा, पावसाळा असे चार महिन्यांचे ऋतू होते. आता काळ बदलला आहे. सहा महिने पावसाळा, सहा महिने हिवाळा व उन्हाळा बाहेरून पाठिंबा देतो. त्यामुळे याला ‘छंदील’ असे नाव दिले आहे.
याशिवाय दिवाळी म्हणजे मोठ्या मोठ्या रांगोळ्या रेखाटणे ही महिलांची हौस असते. पण पाऊस जर असाच पडत राहिला तर रांगोळ्या रेखाटणार तरी कशा? यामुळे ‘रांगोळी घरात अंघोळ दारात’ असेही एक मिम तयार झाले आहे. नरक चतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नान महत्त्वाचे असते. त्याला अनुषंगून हे मिम तयार झाले आहे. आता दिवाळीच्या निमित्ताने पावसाने निरोप घ्यावा आणि खरेदीसह दिवाळीचा आनंद घेऊ द्यावा, अशी प्रार्थना नागरिक करीत आहेत. हाताशी आलेले पीक उभे राहू दे, अशी विनवणी बळीराजा करत आहे.