वाट तुझी पाहता...
जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणजे माया, प्रेम, काळजी आणि समस्त जनांच्या उद्धाराची कळकळ, तळमळ असणारे हळवे पितृहृदय आहे. ‘ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावीण प्रीती’ असे संतांचे वर्णन करणारे संत तुकाराम महाराज ‘कन्या’ ही प्रतिमा वापरतानादेखील खूप हळवे होतात. ‘कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी पाहे’ या अभंगात ते आपले विठुरायाकडे धावणारे मन या प्रतिमेने व्यक्त करतात. ‘तैसे झाले माझ्या जिवा, केव्हा भेटसी केशवा’.. सासरी जाणाऱ्या मुलीचे डोळे जसे वारंवार भरून येतात आणि ती मागे मागे माहेरच्या वाटेकडे सारखी बघत असते. ती अवस्था संत तुकाराम महाराजांची झाली. ‘भेटीलागी जीवा, लागलीसे आस’ या अभंगात संत तुकाराम महाराजांची विठुरायाच्या भेटीची आस शिगेला पोचली आहे. ‘पाहे रात्रंदिवस वाट तुझी’ या शब्दात व्याकुळता व्यक्त करीत ते म्हणतात, ‘दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची..’ ज्याप्रमाणे मुलगी व्याकुळतेने दिवाळीला न्यायला माहेरचे माणूस कधी येईल याची वाट बघते त्याप्रमाणे मी पंढरीची वाट बघतो आहे. सदेह वैकुंठाला गेलेले तुकाराम महाराज जाताना सांगून गेले होते की मी तीनवेळा परत येईन. त्यानुसार त्यांची कन्या काशीबाई हिला भेटायला ते प्रकट झाले. काशीबाईचा आध्यात्मिक अधिकार मोठा होता. आपले वडील गेल्याचे कळताच तिने हंबरडा फोडला तेव्हा आपल्या कन्येला भेटायला ते परत आले असा चरित्रात उल्लेख आहे.
पूर्वीच्या काळी दारात उभे राहून वाट बघणारी माणसे घरोघरी होती. त्यावेळी काही भ्रमणध्वनी, दूरध्वनी यासारखी संपर्कसाधने नव्हती. बाहेर गेलेले, दूर गावाहून येणारे आपले माणूस दिसतेय का, हे बघायला डोळे सतत बाहेरच्या वाटेकडे लागलेले असत. सणावाराला मुराळी म्हणून येणाऱ्या भावाची डोळ्यात प्राण आणून बहिणी वाट बघत. ओवी गाणाऱ्या स्त्रिया म्हणतात, ‘कोणत्या कामात भाईराया गुंतलासी, बहिणीची कासावीशी होत आहे.’ तिच्या मनात उगीच नाना विचार येतात. तिला वाटते की लहानपणी भातुकली खेळताना त्याच्या वाट्याचे दाणे आपण खाल्ले म्हणून तो रुसला की काय? मागच्या वेळेस तो आला तेव्हा काय झाले? ‘न्यावया आलास, नाही पाठविली त्यांनी, अढी काय त्याची मनी धरलीस?’ आपलेच दात आणि आपलेच ओठ! विसरून जा सारे. आणि मग वाट पाहणारे डोळे सुखावतात. दुपारच्या रणरण उन्हात घाटडोंगर उतरून शेला पांघरून भाईराया बहिणीसाठी येताना दिसतो. मग काय होते? ‘भावाला पाहून बहीण गहिवरे, डोळियांचे झरे वाहतात.’ त्याला काय जेवू घालायचे हे आधीच ठरलेले असूनही ऐनवेळी बहिणीची धांदल उडते. ‘भाऊ माझा ग पाहुणा, त्याला शिरा मेजवानी, जिरेसाळी गहू, खिरीला किती घेऊ, जेवणार माझा भाऊ सोनसळे, गहू रवा येतो दाणेदार, फेण्यांचे जेवणार भाईराया, सोनसळे गहू त्यात तुपाचे मोहन, भावाला जेवण.’ भावाबहिणीचे हे अमृत नाते अमृतासारख्या जेवणाने अधिक स्मरणीय होत असावे.
वाट बघणे हे एक प्रेमाचे लक्षण आहे. घरी कुणीतरी माझी वाट बघते आहे, जेवणासाठी खोळंबले आहे. अजून का आला नाही यामुळे मन अस्वस्थ आहे आणि मुख्य म्हणजे खात्री आहे की आपले माणूस उगीच उशीर करणार नाही. काहीतरी कारण असेल. एकमेकांसाठी जेवायला थांबणे यात असलेला अबोल जिव्हाळा खूप काही सांगून जातो. त्यातली गोडी ज्याला-त्यालाच कळते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे हुच्चुराव म्हणून एक शिष्य होते. ते ब्रह्मचारी, एकटे होते. त्यांना एकदा काही कामासाठी बाहेर जावे लागले. यायला खूप उशीर झाला. रात्रीचे नऊ म्हणजे त्याकाळी फारच उशीर. गोंदवल्याकडे परतताना त्यांच्या मनात आले की आपल्याला उशीर झाला खरा, परंतु आपली वाट बघणारे या जगात कोण बरे आहे? ते गोंदवलेला आले तेव्हा तात्यासाहेब त्यांची वाट बघत होते. ब्रह्मचैतन्य महाराजांनी देह ठेवल्यावर ते तात्यासाहेबांच्या देहमाध्यमातून वाणीरूपाने बोलत असत. हुच्चुरावांना ते गुरुस्थानी होते. आल्याबरोबर त्यांना तात्यासाहेब म्हणाले, ‘आय वॉज वेटिंग फॉर यू.’ हे ऐकून हुच्चुरावांच्या डोळ्यात पाणी आले. ज्याला लौकिकात कोणी वाट बघणारे नसते त्यांची सद्गुरू मात्र आठवणीने वाट बघतात हे त्याचे साक्षात उदाहरण
आहे.
आषाढी एकादशी जवळ आली की विटेवरच्या विठुरायाचे डोळे आपल्या भक्तांकडे लागतात. ज्यांना कोणी नाही अशा भक्तांची तर तो डोळ्यांत प्राण आणून वाट बघतो. जुन्या काळच्या सासुरवाशिणींचे आंतरमाहेर म्हणजे पंढरी असे कवयित्री इंदिराबाई संत म्हणतात. पांडुरंग हा त्यांच्या जिवाचा सखा असून त्याला चटकन उठून भेटायला त्यांना काही जाता येत नाही. शेतीभातीची कामे, घरातली कामे, एकत्र कुटुंब, लहान मुले, सासरचा धाक एवढे डोंगर चढून, ओलांडून एखादी भाग्यवान मालन पंढरीच्या वाटेकडे निघते. ती तिचा भौतिक संसार विसरून जाते. पंढरी म्हणजे तिचे माहेर. विठ्ठल-रखुमाई तिचे आईवडील, पुंडलिक हा भाऊ. नदी चंद्रभागा ही भावजय. ती पंढरीला यायला निघाली की विठुराया संत नामदेव महाराजांना तिचा भाऊ मुराळी म्हणून पाठवतो. जपून आण रे असे सांगतोदेखील. जात्यावर बसून ओव्या गाणाऱ्या बायकांची पंढरीची स्वप्नशाळा तुमच्याआमच्या कल्पनेतही येत नाही. ती ओवी घालणारी मालन काय म्हणते?
‘पंढरीच्या वाटं न्हयी लागत थंडीवारा
इटू देव माझा हळू नेतुया माह्यारा..’
-एरवी तिला काबाडकष्ट केल्याशिवाय भाकरीचा तुकडा मिळत नाही. परंतु दिंडीमध्ये न्याहारी म्हणून गोपाळकाला अगत्याने तिच्या पुढ्यात येतो. हा मायबाप विठू किती काळजी घेतो बरं? घासाघासाला ती पांडुरंगाची आठवण काढून डोळे पुसते.
‘पंढरीला गेले, उबी ऱ्हायीले रंगशीळ
इटू ग बोलतो कवा आलीस लेकबाळ?’
-वाट बघणारा विठू तिला अपार मायेने विचारतो, कवा आलीस लेक बाळ? ‘लेक बाळ’ हे विशेषण मायेने, प्रेमाने ओथंबलेले आहे. ती जेव्हा पंढरीला पोहोचते तेव्हा अवघा संसार विसरून जाते. बाईमाणूस म्हणून घरी परतायचे आहे; पण तिला पंढरीतच राहायचे आहे. मग ती कशी राहणार? तर
‘पंढरपुरीची मी ग व्हयीन परात
विठूच्या पंगतीला वाढीन साखरभात..’
‘पंढरपुरामंदी मी ग व्हयीन चिमनी
इठ्ठलाच्या पंगतीचं बाई येचीन दानापानी’
-केवढा हा उच्च भाव! ही प्रीत भक्तिभाव जागवते.
विठुराया भक्तांच्या भेटीसाठी आतुरला असतो. तो रुक्मिणीला म्हणतो, ‘विठ्ठल म्हणीत्याती चल रुक्मिणी माडीवरी, आली आळंदीची दिंडी पाहू चल घडीभरी’.. तो म्हणतो, ज्ञानोबातुकाराम दुरून पायीपायी आले, दिवा लाव, कीर्तनाला जागा दाव आणि पदर खोचून एक काम कर. कोणते बरे? तर, भोजनाची सोय कर. ‘विठ्ठल देव बोले, नीस रुक्मिणी गहू डाळ..’ रुक्मिणीबाई नंतर हसत हसत स्वयंपाकघरात जातात आणि त्याचा ताबा घेतात. द्वादशीला पुरणपोळ्या करतात. ‘पंढरपुरामंदी घरोघरी पोळ्या होती, देव विठ्ठलाच्या लेकी सासऱ्याला जाती’. जन्मभराची ही शिदोरी. सावळ्या सख्या विठुरायाची.
जिव्हाळ्याने वाट बघणाऱ्या नात्यांनी व्यावहारिक जगातून आता हळूहळू काढता पाय घेतला आहे. मात्र आध्यात्मिक क्षेत्र याला कायमच अपवाद राहील. माऊलीहुनी मवाळ असणारे सद्गुरू आणि उंच गडांवर दुर्गम भागात एकांत स्थळी वास करणारे आपले देवी आणि देवता हे भक्तांना इच्छित स्थळी म्हणजे अर्थातच मोक्ष वाटेपर्यंत नेऊन ठेवण्यासाठी त्यांची कायमच वाट बघतील. काळ कितीही बदलला तरी ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ असे म्हणत जाणारे वारकरी चिरंतन राहतील, हे नक्की
-स्नेहा शिनखेडे