For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘रक्त सांगते कथा मुक्तीची’

06:49 AM Jan 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘रक्त सांगते कथा मुक्तीची’
Advertisement

गोव्याने दरवर्षीप्रमाणे गेल्या 19 डिसेंबर या दिवशी मुक्तिदिन मोठ्या आनंद व उत्साहाने साजरा केला. पोर्तुगीज राजवटीविऊद्ध लढताना आपले अमूल्य आयुष्य पणाला लावणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यासाठी तसेच गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला, आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस राज्यभर साजरा केला जातो. गोवा मुक्तीचे यंदाचे हे 64वे वर्ष राज्यात विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात आले.

Advertisement

गोवा 1510 ते 1961 पर्यंत 450 वर्षांहून अधिक काळ पोर्तुगीज वसाहतींच्या अधिपत्याखाली होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण गोवा भारतीय उपखंडाचा भाग असूनही पोर्तुगीजांच्या नियंत्रणाखाली राहिला. 1961च्या या ऐतिहासिक दिवशी भारतीय सैन्याने आपल्या धैर्याने गोव्याला 450 वर्षांच्या पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीच्या बंधनातून मुक्त केले आणि गोवा भारताचा अविभाज्य भाग बनला. स्वातंत्र्याचा प्रवास लांब आणि खडतर होता. गोवा आणि भारताच्या इतर भागांतील स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांच्या मुक्तीच्या लढ्यात अनेक कष्ट सोसले आणि त्यांना बलिदान द्यावे लागले.

गोवा मुक्तिदिन हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. 19 डिसेंबर हा गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांच्या शौर्याचा, हुतात्मे झालेल्या वीरपुरुषांचा स्मरणदिन आहे. यामुळेच खऱ्याअर्थाने हुतात्म्यांना आदरांजली ठरणार आहे. गोवा राज्य मुक्ततेसाठी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध, वसाहतवाद विरोधातील लढा ही शौर्याची गाथा आहे. गोवा मुक्तिदिनाच्या पूर्वसंध्येला गोवा मुक्ती चळवळीतील चौदा हुतात्म्यांच्या कायदेशीर वारसांचा औपचारिक सत्कार करण्यात आला. 15 ऑगस्ट 1955 रोजी गोव्याच्या सीमेवर पोर्तुगीज सैनिकांनी निर्घृणपणे मारले गेलेल्या वीर, शूरपुरुष स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाची सरकारने प्रथमच दखल घेतली आहे. 1955मध्ये गोवा मुक्तिसंग्रामात 74 सत्याग्रही शहीद झाले. त्यातील पंधरा शहीदांच्या कायदेशीर वारसांचा शोध घेण्यात सरकारला यश लाभले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे लागतील. स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाची पूर्वीच्या सरकारांनी कधीही दखल घेतली नाही. त्यांच्या कुटुंबियांना किंवा नातेवाईकांना पेन्शन किंवा सन्मान लाभला नव्हता.

Advertisement

यंदाच्या गोवा मुक्तिदिन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला 18 डिसेंबर रोजी या शहीदांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची एकरकमी आर्थिक मदत आणि सन्मानपत्र देण्यात आले. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अभिनंदनास पात्र आहेत. 1954 मध्येच राष्ट्रीय काँग्रेस (गोवा)च्या सदस्यांनी 15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ पोर्तुगीजांच्या विरोधात मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठरलेल्या दिवशी सत्याग्रही नेते आल्प्रेड आफोन्सो यांनी तेरेखोल किल्ल्यावर तिरंगा ध्वज लावला आणि तो 22 तास फडकत ठेवला. त्याचप्रमाणे मार्क फर्नांडिस यांनी पत्रादेवी आणि अँथोनी डिसोझा यांनी पोळे-काणकोण गटाचे नेतृत्त्व केले. सर्वांना अटक करण्यात आली. या घटनांमुळे पोर्तुगीज सत्तेविरुद्ध चीड निर्माण झाली. अनेकजण गोवा मुक्तीसाठी सरसावले. सत्याग्रहींनी त्यांचे आंदोलन पुढे नेण्याचे ठरविले आणि भारताच्या स्वातंत्र्यदिनी पुन्हा मोठ्या संख्येने सीमेवर हल्ला करण्याची योजना आखली. गोवा विमोचन साहाय्यक समितीने सामूहिक सत्याग्रहासाठी दिलेल्या आवाहनानंतर देशभरातील अनेक तरुणांनी गोव्यात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हजारोंच्या संख्येने त्यांनी उत्तरेकडील पत्रादेवी आणि दक्षिण गोव्यातील पोळे आणि कॅसलरॉक येथे कूच करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मध्यप्रदेशातील एका तरुणीचा समावेश होता. तिच्यावर पत्रादेवी सीमेजवळ पोर्तुगीज सैनिकांनी गोळ्या झाडल्या. त्यादिवशी 70 हून अधिक सत्याग्रही हुतात्मे झाले होते. या ऐतिहासिक प्रसंगाची आठवण म्हणून धाडसी आणि पराक्रमी सैनिकांना तसेच नि:स्वार्थ स्वातंत्र्यसैनिकांना आम्ही नमन करणे योग्य आहे. तसेच गोवा मुक्तीसाठी आपल्या मौल्यवान प्राणांचा त्याग केलेल्या त्या महान आत्म्यांचे स्मरण ठेवणे कर्तव्य ठरते.

गोवा मुक्तिगाथा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास सध्या पेडणे येथील नवचेतना युवक संघाने घेतला आहे. यासाठी युवा कार्यकर्ते व संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांनी पावले उचलली आहेत. गोवा मुक्तिसंग्रामात पेडणे तालुक्यात घडलेल्या ठळक घटनांवरती आधारित एका ‘रक्त सांगते कथा मुक्तीची’ या मुक्तिगीताचे गेल्या डिसेंबर महिन्यात विर्नोडा-पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालयात लोकार्पण झाले. या उपक्रमाबद्दल नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर व त्यांच्या टीमला धन्यवाद द्यावे लागतील.

या मुक्तिगीताचे लेखन मेघश्याम पालयेकर यांनी केले असून संगीतकार शिवानंद दाभोळकर हे आहेत. हरहुन्नरी कलाकार प्रसाद परब यांचे दिग्दर्शन तर सहदिग्दर्शन गोविंद नाईक यांचे आहे. या मुक्तिगीतात पेडण्याच्या भूमीवर हौतात्म्य पत्करलेल्या शूरवीरांचा इतिहास आणि रक्तरंजित आठवणींचा समावेश आहे. गायक प्रसन्न प्रभू तेंडुलकर, दशरथ नाईक, गायिका श्रद्धा जोशी, स्नेहल गुरव, मितेश चिंदरकर, छायाचित्रकार मेघराज आकारकर यांचेही उपक्रमात बहुमोल योगदान आहे.

या मुक्तिगीताच्या निमित्ताने स्वातंत्र्यसेनानी ज्या स्थळावर हुतात्मा झाले, त्या पेडणे तालुक्यातील केरी-तेरेखोल, पालये तसेच पत्रादेवी, चांदेल येथे कलाकार टीमने भेट देऊन खास मोबाईल, ड्रोनद्वारे चित्रीकरण केले. या मुक्तिगीताचे वैशिष्ट्या म्हणजे खुद्द गोव्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी या चित्रीकरणात सहभाग दर्शवून या हुतात्म्यांविषयी आदरभाव प्रकट केला. चित्रीकरणासाठी त्यांनी पेडणे तालुक्यात दोन दिवस मुक्काम केला. रक्ताने लाल झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या हुतात्मा झालेल्या पत्रादेवी येथील पुण्यभूमीत आणि शहीद झालेल्या पंजाबचे सुपुत्र कर्नल सिंग बनिपाल यांच्या स्थळाला भेट देऊन त्यांनी अभिवादन केले. चांदेल येथील बापू गावस, बाळा देसाई यांच्या स्मारकाजवळ चित्रीकरणप्रसंगी चक्क घोड्यावर स्वार होऊन, हातात तिरंगा ध्वज फडकावत चित्रीकरणाचा आनंद त्यांनी लुटला. या चित्रीकरणातील ठळक निवेदने त्यांच्या आवाजात केलेली आहेत. चित्रीकरणासाठी दोन दिवस मंत्री गावडे यांनी पेडण्यात घालवले. यामुळे मंत्री गावडे अभिनंदनास पात्र आहेत.

पेडणे तालुक्यातील पालये येथील श्री भूमिका वेताळ मंदिरावर तिरंगा फडकावताना हुतात्मा झालेल्या पन्नालाल यादव यांच्या घटनेचेही चित्रीकरण करण्यात आले. या स्थळालाही मंत्री गोविंद गावडे यांनी भेट देऊन चित्रीकरणात सहभाग दर्शविला. पन्नालाल यांचे राजस्थानमधील राजमंडी हे मूळ गाव. नगरपालिकेत ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. गोव्याला पोर्तुगीज जुलूमातून मुक्त करण्यासाठी त्यांनी आरोंदा-सिंधुदुर्ग येथून पालये गाठले होते. पालये येथील श्री भूमिका वेताळ मंदिरावर तिरंगा फडकाविण्याची कामगिरी त्यांनी स्वीकारली होती. त्या पहाटे ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात पन्नालाल यांनी तिरंगा घेत थेट मंदिराचा कळस गाठला. तेवढ्यात ही वार्ता पोर्तुगीजांपर्यंत पोहोचली. संगीनधारी सैनिक मंदिराजवळ येऊन पोहोचले. ‘खबरदार झेंडा फडकाविलास तर...’ अशा धमक्या सुरू झाल्या मात्र याची पर्वा न करता पन्नालाल यांनी तिरंगा फडकाविला. त्याचवेळी चिडलेल्या अधिकाऱ्यांनी गोळ्या झाडून पन्नालाल यांच्या देहाची चाळण केली होती. पालये गावातील ग्रामस्थ, ग्रामप्रमुखांनी या हुतात्म्याला मानसी-पालये येथे अग्नी दिला. या जागेचेही ड्रोनपद्धतीने चित्रीकरण करण्यात आले. राज्य सरकारने या हुतात्म्याच्या परिवाराचा शोध घेऊन त्यांचा योग्य तो सन्मान करणे आवश्यक आहे.

पोर्तुगीजांच्या जोखडाखाली मुक्त झालेला गोवा आज नोकरीकांड, जमीन बळकाव प्रकरणे तसेच अन्य विविध प्रकरणांनी बदनाम होत आहे. जमिनीही दिल्ली तसेच अन्य परप्रांतियांच्या हातात जात आहेत. त्यामुळे भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. पुढच्या पिढीसाठी नेमके आम्ही काय वाढवून ठेवत आहोत, याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. गोवा सुरक्षित राखला तरच या हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी ठरेल. गोवा सुरक्षित राखणे हे सरकारबरोबरच गोमंतकीयांचे कर्तव्य आहे. तसेच हे करताना गोव्यासाठी हुतात्मा झालेल्यांचे स्मरण आवश्यक आहे. त्यांची शौर्यगाथा, त्यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविणे कर्तव्य ठरते.

राजेश परब

Advertisement
Tags :

.