करुळ घाटमार्ग सुरू होण्याची प्रतिक्षा
कोल्हापूर :
कोल्हापूर - तळेरे या राष्ट्रीय महामार्गावरील गगनबावडा ते करुळ व वैभववाडी ते नाधवडे या मार्गावरील वाहतूक रंदीकरण व काँक्रीटीकरण कामासाठी जानेवारी 2024 पासून बंद करण्यात आलेली आहे. करुळ घाटमार्ग केव्हा एकदा सुरू होणार याची प्रतिक्षा वाहनधारक व प्रवाशांना लागून राहिली आहे. कोल्हापूरचे प्रवेशव्दार कोकणवासीयांसाठी केव्हा खुले होणार असा संतप्त प्रश्न केला जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून गोवा व सिंधूदूर्गला जोडणारा करुळ घाटमार्ग हा सोयीचा व सुरक्षित मार्ग म्हणून परिचित आहे. साधारणत: 1958 च्या दरम्यान येथील दोन्ही घाटमार्ग फोडण्यात आले. तत्कालीन बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई यांचे कारर्किर्दीत एकाच ठिकाणाहून दोन घाटमार्ग कोकणासाठी फोडण्यात आले. मात्र सर्वाधिक पसंतीचा घाट म्हणून करुळ घाटमार्गाने नावलौकीक मिळविला , त्यामुळे या घाटमार्गातून प्रवास करणाऱ्या दररोजच्या सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या लक्षणीय वाढत गेली. हा घाटमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होता. मात्र या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी जोर धरताच हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला. घाटाची अवस्था धोकादयक बनू लागल्याने हा मार्ग रुंदीकरण व मजबूतीकरण करावा, अशी मागणी होऊ लागली.
शासनाने कोल्हापूर ते तळेरे या मार्गाच्या दुपदरीकरणासाठी निधी मंजूर केला. त्यातून पहिल्या टप्यात कोल्हापूर ते कळे व गगनबावडा (सागसाई मंदिर) ते करुळ व वैभववाडी ते नाधवडे असे 21 किमी चे काम महामार्ग विभागाकडून सुरु करण्यात आले. या मार्गातील करुळ घाटाचे काम सुरु करताना सुरक्षेच्या दृष्टीने करुळ घाटमार्ग केवळ दोन महिन्यासाठी बंद ठेवून करुळ घाटमार्गे होणारी सर्व वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. मात्र दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होवू न शकल्याने जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा घाट मार्ग बंद ठेवण्याचे आदेश काढावे लागले. सध्या याला 10 महिन्याचा कालावधी लोटला तरीही घाटमार्गाचे काम सुरुच आहे.
सिंधुदूर्ग जिह्यातील कार्यकर्ते ,वाह़नधारक व व्यापारी संघटनांनी अनेकदा महामार्ग विभागाकडे मार्ग लवकर सुरू करावा, अशी मागणी केली होती.गतीने आणि दर्जेदार काम करावे याबाबत निवेदन दिले होते. पण त्यात फारसा फरक झालेला नाही. गेल्या पावसात या कामाची अक्षरक्ष दैना उडाली. संरक्षक भिंती तुटून गेल्या तर काही ठिकाणी संरक्षक भिंती दरीकडे झुकल्या. जुन्या बांधकामावर झालेले नवीन काम निसर्गाने पहिल्याच पावसात उद्ध्वस्त केले.
जुलैमध्ये भूगर्भशास्त्राचे सल्लागार यांनी दिलेल्या सुचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने संरक्षक भिंतीचे काम गतीने केले असून काँक्रीटच्या संरक्षक भिंतीऐवजी आता जाळीतील दगडांच्या थराच्या संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत
घाटस्त्यातील संरक्षक भिंतीचे व राहीलेल्या रस्त्याचे काम गतीने सुरु असले तरी घाटरस्ता प्रवाशी वाहतूकीसाठी केव्हा खुला होणार हा प्रश्न आहे. या रस्त्यावरील वाहतूकीचा भार दिवसेंदिवस वाढू लागल्याने हा मार्ग रुंदीकरण व मजबूती करण्यात येत आहे. मात्र संथगताने सुरु असलेल्या कामामुळे अद्याप हे काम अपूर्ण आहे. गेल्या दहा महिन्याहून अधिक काळ घाटमार्ग बंद असून अद्यापही घाटमार्गातील काम पूर्ण झाले नसल्याने तळकोकणातील जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गगनबावड्याहून तळकोकणात मार्गस्थ होणारा कोल्हापूर व सिंधुदुर्ग या दोन जिह्यांना व गोवा राज्याला जोडणारा व मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे घाटमार्ग बंद असल्याने याचा फटका येथील स्थानिक व्यावसायिक, व्यापारी, वाहतूकदार व प्रवाशांना बसला आहे. घाट मार्ग सुरु होण्याची डेडलाईन यापूर्वी प्रशासनाने अनेक वेळा देवून ही या मुदतीत घाट मार्ग रूंदीकरण काम पूर्ण होवू शकलेले नाही अद्यापही घाट मार्ग रूंदीकरण काम गतीने सुरू आहे त्यामुळे करुळ घाटमार्ग वाहतुकीस कधी सुरू होणार याची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
स्थानिक व्यवसाय धोक्यात
या मार्गावरील वाहतूक गेल्या दहा महिन्यांपासून अन्य मार्गे वळवल्याने कधी नव्हे इतका शुकशुकाट पसरला आहे. घाटमार्ग बंदीमुळे स्थानिक व्यवसाय धोक्यात आले असून याचा स्थानिक व्यावसायिकांना फटका बसला आहे.काम गतीने पूर्ण करून हा मार्ग लवकर सूरु व्हावा ही येथील व्यावसायिक यांची अपेक्षा आहे.
बाळू घाटगे.हॉटेल मालक,स्वरांजली.
ऊस वाहतूक अडचणीत
करुळ घाटमार्ग वेळीच सुरु न झाल्यास गगनबावडा येथील डी.वाय पाटील सह साखर व जिह्यातील अन्य साखर कारखान्याकडे सिंधूदुर्ग व रत्नागिरी जिह्यातून होणारी ऊस वाहतूक अडचणीत येणार आहे.भूईबावडा घाटमार्ग हा अरुंद व अवघड वळणांचा असल्याने ऊस उत्पादक शेतक-याना याचा आर्थिक फटका बसणार आहे .करुळ घाटमार्ग वाहतूकीसाठी सुरळीत होणे गरजेचे आहे.
बंडूआप्पा पडवळ तज्ञ संचालक डॉ.डी.वाय.पाटील साखर कारखाना,असळज.
जानेवारीत घाटमार्ग सुरू होईल
ढगफुटी सद्रुश्य पावसाने करुळ व भूईबावडा या दोन्ही घाटरस्ते खराब झाले आहेत.कठड्यांची पडझड झाली आहे.कामात व्यत्येय आला आहे.अलीकडेच घाटमार्गाचे कोल्हापूर जिल्हा हद्दीतील काम वेगाने सुरू असून जानेवारी महिन्यात करुळ घाटातील वाहतूक पूर्ववत सुरू होईल
मिलींद वेल्हाळ,कॉन्ट्रॅक्टर राष्ट्रीय रस्ते.