मंत्रिपदासाठी वेटिंग, इच्छुकांमध्ये धाकधूक
मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तबनंतरच मंत्रिमंडळ विस्तार : कोल्हापुरला किती मंत्रिपदे मिळणार उत्स्कुता
कोल्हापूर :
महायुतीला बहुमत मिळाल्याने निकालानंतर सरकार स्थापनसह मंत्रिमंडळाची प्रक्रिया दोन दिवसांत होईल, असेच सर्वांना अपेक्षित होते. परंतू निकाल लागून आठ दिवस झाले तरी महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलेले नाही. मुख्यमंत्री ठरलेला नसल्याने मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळणार हेही गुलदस्त्यातच राहिले आहे. कोल्हापुरात दहा आमदार महायुतीचे असून यापैकी कोणाची वर्णी मंत्रीपदी लागणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रीपदी संधी मिळणार की नाही यावरून कोल्हापुरातील इच्छुकांमध्ये घालमेल सुरू झाली आहे.
विधानसभेच्या झालेल्या निवडणूकीत एकहाती महायुतीची सत्ता आली आहे. कोल्हापुरातूनच प्रथमच महायुतीचे सर्वच 10 उमेदवार निवडून आले. दिल्ली, मुंबईमध्ये राजकीय पातळीवर मुख्यमंत्रीपदावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतू निर्णय काही झालेला नाही. एकीकडे मुख्यमंत्रीवर निर्णय गुलदस्त्यात असल्याने मंत्रीमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडेही सर्वांच्या नजरा आहेत. कोल्हापुरातून महायुतीचे दहा उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भाजप 2, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादीचे 1 आमदार आहे. तर घटक पक्षाचे 4 आमदार आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बैठकीनंतर पक्षानुसार मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरणार आहे. यामध्ये कोल्हापूरमध्ये किती मंत्रीपद मिळणार यावर ठरणार आहे. पालकमंत्रीपदासाठीही कोल्हापुरात रस्सीखेच आहे.
अमल महाडिक पुन्हा मुंबईला
मागील आठवड्यात मंत्रिमंडळ स्थापन होणार असल्याने कोल्हापुरातील 10 आमदार मुंबईला विशेष विमानाने गेले होते. परंतू मंत्रिमंडळ लांबणीवर पडल्याने हे सर्वजण पुन्हा कोल्हापुरात आले. दोन दिवसांपूर्वी आमदार अमल महाडिक पुन्हा मुंबईला गेले आहेत. युवा आमदारांना मंत्रीमंडळात स्थान देणार असल्याचे संकेत वरीष्ठ पातळीवरून होत आहेत. त्यामुळे दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी चर्चाही कोल्हापुरात सुरू झालेली आहे.