'जलजीवन’ची 416 कामे पूर्ण, 786 प्रगतिपथावर
कोल्हापूर :
जिह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 1211 पाणीपुरवठा योजना मंजूर असून त्यापैकी 416 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. 391 कामे 75 ते 99 टक्के पूर्ण झाली असून 227 कामे 50 ते 75 टक्के पूर्ण झाली आहेत. तर 168 कामे प्रगतीपथावर आहेत. काही गावांत ‘जलजीवन‘ योजनेचे काम घेतलेल्या ठेकेदारास विरोध केला जात आहे. संबंधित ठेकेदाराने यापूर्वी केलेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामांचा अनुभव आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम करण्याची पद्धत यामुळे त्या गावातून विरोध होत आहे. तसेच अन्य काही तांत्रिक अडचणींमुळे जिह्यातील 9 योजनांच्या कामांची अद्याप सुरूवात झालेली नाही. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींकडून जिल्हा परिषदेच्या सीईओंसह ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देवून दुसरा ठेकेदार देण्याची मागणी देखील केली असून त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.
जिह्यातील जलजीवन योजनांच्या कामांचा आढावा घेऊन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून ज्या गावांत योजनांचे काम अद्याप सुरू झालेले नाही, त्या कामांसाठी फेरनिविदा काढण्याच्या जि.प. प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. जलजीवन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. केंद्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून कार्यवाही सुरू आहे. प्रत्येक गावांत ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निरिक्षणाखाली कामे सुरळीतपणे सुरू आहेत.
केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून सन 2019 पासून ‘जल जीवन मिशन’ हा एक महत्वांकाक्षी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे. ‘हर घर नल से जल‘ या घोषवाक्यानुसार या प्रकल्पांतर्गत सन 2024 पर्यंत प्रती व्यक्ती प्रती दिन 55 लिटर प्रमाणे प्रत्येक कुटुंबाला नळाव्दारे शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा करणेचे उददीष्ट आहे. पुढील 30 वर्षातील लोकसंख्या विचारात घेऊन ही योजना गतीमान पद्धतीने राबविली जात आहे. कोल्हापूर जिह्यात ‘जल जीवन मिशन’चे काम वेगाने सुरू असून एकूण 1211 योजनांचा समावेश आहे. दरम्यान गडहिंग्लज तालुक्यात 2, हातकणंगले 1, पन्हाळा 1 आणि शिरोळ तालुक्यात सर्वाधित 5 योजनांच्या कामांचा अद्याप श्रीगणेशा झालेला नाही. ही कामे घेतलेल्या ठेकेदारांना पाणीपुरवठा विभागाकडून काम सुरू करण्याबाबत वेळोवेळी नोटीस पाठवून देखील त्यांनी काम सुरू केलेले नाही. परिणामी फेरनिविदा काढून नवीन ठेकेदार नियुक्त करण्याची पाणी पुरवठा विभागाकडून कार्यवाही सुरू आहे.
जलजीवन पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती
तालुका मंजूर कामे प्रगतीपथावर असलेली कामे पूर्ण झालेली कामे
आजरा 83 56 27
भुदरगड 105 54 51
चंदगड 169 148 21
गडहिंग्लज 108 82 24
गगनबावडा 41 28 13
हातकणंगले 67 32 34
कागल 98 60 38
करवीर 120 73 47
पन्हाळा 123 69 53
राधानगरी 108 70 38
शाहूवाडी 137 83 54
शिरोळ 53 31 16
एकूण 1211 786 416