चाहूल गणेश आगमनाची, मूर्ती रंगकाम अंतिम टप्प्यात
गोकुळाष्टमीनंतर सार्वजनिक मंडपांच्या उभारणीला होणार सुरुवात : बाजारपेठा आरासाच्या साहित्यांनी फुलल्या
खानापूर : अवघ्या काही दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने शहरासह तालुक्यात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. बाजारपेठा आरासाच्या साहित्यांनी फुलल्या आहेत. गणेश मूर्तिकार आपल्या कार्यशाळेत मूर्तीना रंगवण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. गणपती रंगवण्याच्या कामाची लगबग कार्यशाळेतून दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मूर्ती पूर्णपणे सुकल्याने गणेशमूर्ती रंगवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. खानापूर शहर आणि तालुक्यातील मूर्तिकार गणेश मूर्तींना अंतिम स्वरुप देण्याच्या कामात व्यस्त झाले असून, मूर्ती रंगवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने गणेशमूर्तीना सुकविण्यासाठी इतर खटाटोप करावा लागणार नसल्याने मूर्तिकार आता मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्याच्या कामात व्यस्थ झाले आहेत. गणेशचतुर्थी अवघ्या 12 fिदवसावर येऊन ठेपल्याने मूर्तिकारानी मूर्तीच्या रंगरंगोटीचे कामे जोरदार सुरू केली आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडप उभारणीलाही गोकुळाष्टमीनंतर सुरुवात होणार आहे.
मूर्ती बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय
खानापूर तालुक्यात प्रामुख्याने खानापूर शहर तसेच ग्रामीण भागात शेकडो मूर्तिकार आहेत. त्यापैकी खानापूर, नागुर्डा, गर्लगुंजी, माडीगुंजी, सिंगीनकोप आदी गावातील गणेशमूर्तीना बेळगाव, हुबळी, धारवाड, कारवारसह इतर भागात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अलीकडे काही मूर्तिकार मोठ्या सार्वजनिक मूर्ती कोल्हापूरहून आणून त्यावर आपली कला साकारतात. पूर्वी खानापूरला केवळ शाडू आणि चिखलाच्या मूर्ती बनवण्याची प्रथा होती. पण हल्ली कारागिराना शाडूच्या मूर्ती परवडणाऱ्या नसल्याने काही कारागीर वगळता बऱ्याच कारागिरांनी आता लहान मूर्तीदेखील प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या करण्यास सुरवात केली आहे. खानापूर शहरात काही कुटुंबिये आजही मूर्ती बनवण्याचा पारंपारिक व्यवसाय जोपासत आहेत.
बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण
गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून गणेशचतुर्थीच्या आरासासाठी लागणाऱ्या सामानाचे स्टॉलही साकारु लागले आहे. तसेच फटाके व्यावसायिकही स्टॉल लावण्याच्या तयारीत आहेत. पुढील आठ दिवसात शहरात गण्sाशोत्सवाच्या खरेदीसाठी झुबंड उडणार आहे. व्यवसाय व नोकरीनिमित्त गोवा, कोल्हापूर, इंचलकरंजी, रत्नागिरी, कराड, सातारा, पुणे, इस्लामपूर यासह इतर ठिकाणी असलेले खानापूरवासीय गणपती सणासाठी गावी येतात. त्यामुळे गणेशोत्सव काळात ग्रामीण भागासह शहरात वर्दळ दिसून येते.
शहरात अकरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यामध्ये बालमंडळ गणेशोत्सव देसाई गल्ली, व्यापारी मंडळ बाजारपेठ, महाराष्ट्र युवक मंडळ स्टेशनरोड, महालक्ष्मी गणेश मंडळ स्टेशनरोड, चव्हाटा गणेश मंडळ निंगापूर गल्ली, गणेश युवक मंडळ केंचापूर गल्ली, चौराशी गणेशोत्सव चौराशी गल्ली, रेल्वे स्टेशन विद्यानगर गणेशोत्सव मंडळ, मेदर गल्ली गणेशोत्सव मंडळ तसेच हलकर्णी-गांधीनगर व ऊमेवाडी क्रॉस येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा प्रामुख्याने समावेश आहे. या मंडळाच्या मंडप उभारणीला गोकुळाष्टमीला मुहूर्तमेढ करून मंडप उभारणीच्या कामास सुऊवात होणार आहे. तसेच गर्लगुंजी गावातही दहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यांचीही तयारी सुरू आहे. या शिवाय खानापूरच्या काही शासकीय कार्यालयातही पाच दिवसाचा गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. त्या ठिकाणी उत्सवाची तयारी सुरू आहे. त्यामध्ये बांधकाम खाते, तहसीलदार कार्यालय, हेस्कॉम कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस प्रशिक्षण केंद्र, हेस्कॉम तसेच केएसआरटीसी आदी शासकीय कार्यालयांचा समावेश आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस होत असल्याने गणेशोत्सव उत्साहात व आनंदात पार पडणार असल्याचे दिसून येत आहे. शहरातील व्यापाऱ्यानी गणेश चतुर्थीच्या सामानाची आरास आतापासूनच सुरू केली आहे. कापड दुकानदारानीही आपल्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. बाजारात फेरफटका मारला असता यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून वर्गानी जमा करण्याच्या कामात कार्यकर्ते गुंतलेले आहेत.
यावर्षी डॉल्बीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय
यावर्षी डॉल्बीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. शहरातील महालक्ष्मी गणेश मंडळाने सांप्रदायिक भजन लावून मूर्ती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे अनुकरण इतर गणेश मंडळाने केल्यास ध्वनी प्रदूषण रोखण्यात यश येणार आहे. पारंपरिक, सांप्रदायिकतेची जपणूकही होणार आहे.