द.आफ्रिका दौऱ्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण हेडकोच
वृत्तसंस्था/ मुंबई
न्यूझीलंडविरुद्धची सध्याची कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चार टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. आगामी आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकात बदल करण्यात आला आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार असल्याने व्हीव्हीएस लक्ष्मण आफ्रिका दौऱ्यात मुख्य प्रशिक्षक असणार असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतीय संघासोबत नसणार आहे. भारतीय संघ 4 नोव्हेंबरच्या सुमारास आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. अशा स्थितीत गंभीर केवळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकणार आहे. दरम्यान, गंभीरच्या अनुपस्थितीत आफ्रिका दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. या चार सामन्यांच्या टी-20 मालिकेचा सुरुवातीला निर्णय झाला नव्हता. परंतु बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांच्यातील चर्चेनंतर हा दौरा निश्चित करण्यात आला आहे.
सपोर्ट स्टाफमध्येही बदल
साईराज बहुतुले, हृषिकेश कानिटकर आणि सुभदीप घोष हे देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोचिंग स्टाफचा भाग असतील. ओमान येथे झालेल्या इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत बहुतुले, कानिटकर आणि घोष यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते. दुसरीकडे, सौराष्ट्रचा सितांशु कोटक आणि केरळचा मजहर मोईडू हे भारत अ संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेले आहेत.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर मालिकेतील शेवटचा सामना 15 नोव्हेंबरला होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ 4 नोव्हेंबरपर्यंत दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल.