For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हीटीयू उभारणार तीन शहरांमध्ये आयडिया लॅब

06:22 AM Dec 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
व्हीटीयू उभारणार तीन शहरांमध्ये आयडिया लॅब
Advertisement

बेळगाव, गुलबर्गा, दावणगेरीत इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना होणार लाभ

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला प्राधान्य देऊन नवनवे प्रयोग करणाऱ्या विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने (व्हीटीयू) आता तीन ‘आयडिया लॅब’ सुरू करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. बेळगाव, गुलबर्गा व दावणगेरी येथे या लॅब सुरू करण्यात येणार असून एआयसीटीई आयडिया लॅब म्हणून त्या नावारुपास येणार आहेत.

Advertisement

अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) तांत्रिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देशातील इंजिनिअरिंग, महाविद्यालयांमध्ये आयडिया लॅब स्थापन करण्यासाठी योजना आखली आहे. त्यानुसार व्हीटीयूच्या बेळगाव, गुलबर्गा व दावणगेरी येथे लॅब सुरू होणार आहेत. या संदर्भात व्हीटीयूने निविदा प्रक्रिया राबविली आहे. प्रत्येक लॅबला 70 ते 80 लाख रुपये खर्च अपेक्षित असून तिन्ही लॅबसाठी 2 कोटीहून अधिक खर्च येणार आहे. लॅब उभारण्याचा संपूर्ण खर्च एआयसीटीई करणार नाही. त्याऐवजी एआयसीटीई, विद्यापीठ व माजी विद्यार्थ्यांचा निधी अशा तीन संस्थांकडून निधी जमवून लॅब उभारण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. एखाद्यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या निधीतून पैसा जमा न झाल्यास शिक्षण संस्थांकडून निधी जमविण्यात येणार आहे.

आयडिया लॅबची वैशिष्ट्यो

सर्वसामान्यपणे इंजिनिअरिंग महाविद्यालयात लॅब अर्थात प्रयोगशाळा ही असतेच. मात्र आयडीया लॅबमध्ये सामान्य लॅबमध्ये नसणाऱ्या सुविधा, उपकरणे असणार आहेत. त्याशिवाय ही लॅब केवळ एका विभागासाठी मर्यादित राहणार नाही तर अनेक विभागांसाठी उपयोगी ठरणार आहे. शिवण यंत्रापासून थ्रीडी कटिंग मशिनपर्यंत विविध प्रकारची उपकरणे या लॅबमध्ये असतील. पहिल्या ते आठव्या सेमीस्टरपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या लॅबचा उपयोग होणार आहे.

मुद्देनहळ्ळी येथे  व्हीटीयूची लॅब

विद्यार्थ्यांना प्रायोगिक शिक्षण खोलवर देण्याच्या उद्देशाने एआयसीटीई लॅबची उभारणी करत आहोत. सध्या मुद्देनहळ्ळी येथील व्हीटीयूच्या कॅम्पसमध्ये लॅब सुरू आहे. याच प्रकारचे लॅब इतर व्हीटीयू महाविद्यालयांमध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरु डॉ. एस. विद्याशंकर यांनी माध्यमांना दिली आहे.

Advertisement
Tags :

.