देशात उद्या 11 राज्यातील 93 मतदारसंघात मतदान
तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या : अमित शाह, दिग्विजय, डिंपल यांच्यासह दिग्गज रिंगणात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार, 7 मे रोजी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी रविवार 5 मे रोजी सायंकाळी जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता मंगळवारी देशाच्या वेगवेगळ्या भागातील 11 राज्यातील 93 जागांवर मतदान होणार आहे. गुजरातमधील सर्व 26 जागांवर या टप्प्यात मतदान होत असून कर्नाटकातील 14 आणि महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातही निवडणूक पार पडेल. तथापि, निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघातील मतदानाची तारीख बदलली आहे. आता येथे 7 मे ऐवजी सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान होणार आहे.
देशात आतापर्यंत लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमध्ये 102 जागांवर मतदान झाले होते, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी 88 जागांवर मतदान झाले. त्यानंतर आता 7 मे रोजी आयोजित तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिवराजसिंह चौहान, दिग्विजय सिंह, डिंपल यादव, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या लोकसभेतील राजकीय भवितव्याचा फैसला निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदानयंत्रात बंद होणार आहे. त्यानंतर 13 मे रोजी चौथा टप्पा, 20 मे रोजी पाचवा टप्पा, 25 मे रोजी सहावा टप्पा आणि 1 जून रोजी सातवा टप्पा होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मतदान
तिसऱ्या टप्प्यातील जाहीर प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी झाली. त्यानंतर आता छुपा प्रचार आणि मतदानाच्या तयारीत सर्वच उमेदवार आणि राजकीय पक्ष जोमाने गुंतले आहेत. तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार जागृती अभियानाचे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. तिसऱ्या टप्प्यात कर्नाटक, मध्यप्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा आणि नगर हवेली/दमण आणि दीव येथे मतदान होईल.
दिग्गजांचा फैसला
7 मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर ज्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील केले जाईल अशा लोकांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचा प्रामुख्याने समावेश आहे. ते गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. मध्यप्रदेशमध्ये विदिशामधील शिवराजसिंह चौहान, गुना शिवपुरीतील ज्योतिरादित्य सिंधिया आणि राजगडमधील दिग्विजय सिंह आदी दिग्गज नेतेही याच टप्प्यात आपले भवितव्य आजमावतील. याशिवाय उत्तर प्रदेशातील मुलायम कुटुंबातील डिंपल यादव, अक्षय यादव आणि आदित्य यादव यांच्या भवितव्याचाही फैसला मंगळवारी होणार आहे.