For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभेच्या दोन जागांसाठी आज मतदान

11:18 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकसभेच्या दोन जागांसाठी आज मतदान
Advertisement

एकूण 11,79,344 मतदार बजावणार मतदानाचा हक्क : पुऊषांपेक्षा महिला मतदारांची संख्या 29 हजारांनी अधिक,सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान,कडक उन्हामुळे लिंबू पाणी, शीतपेय, वैद्यकीय सुविधा

Advertisement

पणजी : 18 व्या लोकसभेसाठी गोव्यातील दोन जागांकरिता आज मंगळवारी 7 मे रोजी मतदान होत आहे. राज्यातील 11 लाख 79 हजार 344 मतदार हे 16 उमेदवारांचे भवितव्य सील करतील. उत्तर गोव्यात 5 लाख 80 हजार 710 मतदार आहेत तर दक्षिण गोव्यात 5 लाख 98 हजार 934 मतदार आहेत. पुऊष मतदारांपेक्षा महिला मतदारांचे प्रमाण हे 29 हजारांनी अधिक आहे. मतदानाची सारी तयारी पूर्ण झाली असून 1725 मतदान केंद्रे सज्ज झालेली आहेत. उत्तर गोव्यात 863 तर दक्षिण गोव्यात 862 मतदान केंद्रे आहेत. राज्यात सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस उमेदवारांच्या दरम्यान सर्वाधिक मते मिळविण्यासाठी चुरशीची लढाई आहे. दक्षिण गोव्यात प्रथमच सत्ताधारी भाजपने महिला उमेदवार दिला असून गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्याचा चंग बांधलेल्या भाजपने सारी ताकद पणाला लावली आहे. सालसेत तालुक्यात बंपर व्होटिंगद्वारे आघाडी मिळविण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. आज सकाळी 7 वा. पासून सायंकाळी 6 पर्यंत मतदान होईल. मतमोजणी दि. 4 जून रोजी होईल. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सारी यंत्रणा सज्ज झाली आहे.

80 टक्क्यांहून अधिक मतदानासाठी प्रयत्न

Advertisement

कडक उन्हाचा त्रास मतदारांना होऊ नये आणि ते मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर यावेत म्हणून तेथे लिंबू पाणी, शीतपेय, थंडपाणी व वैद्यकीय सुविधा देण्यात आली आहे. एकूण 80 टक्क्यांहून अधिक मतदान व्हावे म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे सर्व ते प्रयत्न करण्यात येत आहेत. कडक उन्हामुळे मतदान कमी होण्याची धास्ती सर्वांनाच वाटत असून मतदारांना मतदानासाठी आकर्षित करण्याकरिता सर्व ती तयारी करण्यात आली आहे.

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र

मतदानासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक असून मतदार यादीत नाव असणे बंधनकारक आहे. मतदार ओळखपत्र नसल्यास वाहन परवाना, पॅन कार्ड, बँक पासबूक (फोटोसह), पासपोर्ट, मनरेगा कार्ड, आधार कार्ड, राज्य व केंद्र सरकारचे ओळखपत्र इत्यादी कोणताही पुरावा सादर कऊन मतदान करता येणार आहे. दिव्यांग आणि वरिष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांनी रात्री घेतला केंद्रांचा ताबा

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल सोमवारी सायंकाळी मतदान केंद्रांतील कर्मचारी, अधिकारी मतदान यंत्रे व इतर आवश्यक साहित्य घेऊन नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. रात्रीपर्यंत त्यांनी मतदान यंत्रणा सज्ज केली असून आता सर्वांची नजर प्रत्यक्ष मतदानाकडे लागलेली आहे. गोव्यात आज मतदान असताना राज्यातील शेकडो मतदार काल विशेष रेल्वेने वालांकिनी (तामिळनाडू) येथे रवाना झाले आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सदर रेल्वेगाडीचे आरक्षण करण्यात आले होते. त्यामुळे मतदानासाठी थांबता येत नसल्याचे आणि वालंकिणीकडे जावे लागत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली. कर्नाटकातही आजच मतदान असल्याने काल सायंकाळी गोव्यातून तिकडे जाणाऱ्या कदंब व इतर बसगाड्या तेथील मतदारांनी हाऊसफुल्ल होऊन गेल्याचे निदर्शनास आले. राज्यात एकूण 229 विशेष मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून त्यात महिला कर्मचारी, अधिकारी असलेल्या दोन्ही मतदारसंघांतील प्रत्येकी 20 पिंक (गुलाबी) केंद्रांचा समावेश आहे. त्याशिवाय पर्यावरणीय अशी दोन्ही मतदारसंघात मिळून 40 हरित केंद्रे उभारण्यात आली आहेत. एकूण 110 नमुनेदार (मॉडेल) मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून दिव्यांगांनी चालवलेली एकूण 8 मतदान केंद्रे आहेत. जुन्या वारसा जागेतील वेगळेपण टिकवण्यासाठी युनिक मतदान केंद्रही त्यात समाविष्ट असल्याचे सांगण्यात आले.

वृक्षारोपणाने होणार मतदानाला सुऊवात

काही मतदान केंद्रांवर ऊग्णवाहिका तसेच वैद्यकीय सेवा देण्यात आली असून शहरी व गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आपत्कालीन सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्राच्या आवारात तेथील अधिकारी, कर्मचारी मिळून 5 झाडे लावणार आहेत. हे काम मतदान सुऊ होण्यापूर्वी केले जाणार आहे. उत्तर गोव्यात वारखंड (पेडणे) तर दक्षिण गोव्यात वार्का - नावेली जंक्शन व काणकोण बायपास जवळील राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणी मतदारांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले आहे. त्याची देखभाल नंतर वनखाते करणार आहे. निवडणुकीत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, ती मुक्त, निष्पक्ष, मैत्रीपूर्ण वातावरणात व्हावी म्हणून सर्व मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच केंद्रीय राखीव दलाची सशस्त्र तुकडी तैनात करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

दोन्ही मतदारसंघांतील मतदान सुरळीतपणे पार पडावे, यासाठी राज्य पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलाच्या बारा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शहरापासून ग्रामीण भागातील प्रत्येक नाक्यावर भरारी पथकाची वाहने कार्यरत आहेत. अनेक ठिकाणी लोकांची वाहने अडवून तपासणी केली जात आहे. मतदान केंद्रांच्या हद्दीत जमावबंदी लागू करण्यात आली असून 144 कलम लागू करण्यात आले आहे. मतदान केंद्राच्या 200 मिटर आवारात हाटेल आणि अन्य आस्थापने बंद ठेवण्याचाही आदेश जारी करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.