घरामध्येच मतदानाचा ‘सेटअप’
कोल्हापूर :
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हा निवडणूक प्रशासनाने 85 वयावरील व दिव्यांग मतदार जे मतदाना दिवशी मतदान केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत. अशांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कोल्हापुरात दोन दिवसांपासून गृह मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये संबंधित मतदानाच्या घरामध्येच मतदान केंद्राची उभारणी केली जात आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यामध्ये मतदान कक्ष, मतपेटी ठेवली जात आहे.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन प्रशासनाला केला आहे. यानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने 80 टक्कांवर मतदान होण्याचे टार्गेट ठेवले आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 85 वयावरील आणि दिव्यांग मतदारांचे मतदान त्यांच्या घरामधूनच घेतले जात आहे. दोन दिवसांपासून जिल्हा निवडणूक प्रशासनाने दहा मतदार संघात गृह मतदानाला सुरुवात केली आहे. यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केली आहेत. यामध्ये अधिकारी, सहाय्यक अधिकारी, मदतनीस, पोलिस यांचा समावेश आहे. हे पथक मतदानासाठीचे सर्व आवश्यक साहित्य थेट मतदारांच्या घरातच घेऊन जात आहेत. मतदान केंद्रामध्ये जसा सेटअॅप असतो. तसाच सेटअॅप ते संबंधित मतदारांच्या थेट घरात करत आहेत. गृह मतदानाच्या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरूवारी 2 हजार 559 दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. घरातच त्यांच्या मतदानाची सर्व सुविधा उपलब्ध केली होती.
एकूण गृह मतदान - 4 हजार 601
85 वर्षावरील मतदान-3 हजार 870
दिव्यांग मतदान- 731
पहिल्या दिवशी झालेले गृहमतदान-2559
गृह मतदानासाठी कर्मचाऱ्यांचे पथक -209