मतदान प्रक्रिया पूर्ण, मतमोजणीवर लक्ष
आठ राज्यांमधील 57 जागांवर मतदान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणूक-2024 च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. मतदानाचा सातवा टप्पा संपल्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व संबंधित मतदार, मतदान अधिकारी, सुरक्षा दल, मीडिया आणि राजकीय पक्षांचे आभार मानले. सातव्या टप्प्यानंतर मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मंगळवार, 4 जून रोजी लोकसभेच्या सर्व जागांची मतमोजणी होणार असून त्याचदिवशी रात्रीपर्यंत निकाल जाहीर होणार आहेत.
अंतिम टप्प्यात 904 उमेदवार रिंगणात असून या सर्वांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. शनिवार म्हणजेच 1 जून रोजी 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांवर मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या व्होटर टर्नआउट अॅपनुसार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.34 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 69.89 टक्के मतदान झाले तर, बिहारमध्ये सर्वात कमी 48.86 मतदान झाले. याशिवाय ओडिशातील विधानसभा निवडणुकीसाठी 62.46 टक्के मतदान झाले. 4 राज्यांतील विधानसभेच्या 9 जागांवरही पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले.
सातव्या टप्प्यातही पश्चिम बंगालमधून हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. पश्चिम बंगालच्या भांगरमध्ये सीपीआय(एम) आणि आयएसएफ कार्यकर्त्यांनी टीएमसी समर्थकांवर बॉम्ब हल्ल्याचा आरोप केला आहे. याचदरम्यान राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने ट्विट करत जमावाने जयनगरमधील बेनिमाधवपूर शाळेजवळ सेक्टर ऑफिसरच्या ताब्यातील राखीव ईव्हीएम आणि कागदपत्रे लुटल्याची माहिती दिली. 1 ईव्हीएम, 1 बीयू आणि 2 व्हीव्हीपॅट मशिन पळवल्यानंतर ती तलावात टाकण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अतिउष्म्यामुळे मतदाराचा रांगेतच मृत्यू
शनिवारी झालेल्या अंतिम टप्प्यावेळी बलिया येथे मतदानासाठी आलेल्या एका वृद्धाचा मतदान केंद्रावर मृत्यू झाला. ते मतदानासाठी रांगेत उभे असताना बेशुद्ध पडले. काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. उष्णतेमुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.