जिह्यात शांततेत मतदान
कोल्हापूर :
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात मतदान शांततेत पार पडावे, याकरीता पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करीत, बंदोबस्तासाठी आठ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात केल्याने, मतदान दिवशी (बुधवारी) जिह्यात कोठेही अनुचित घटना घडली नाही.
विधानसभेचे जिह्यात मतदान शांततेत पार पडावे, यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सुमारे दोन महिने अगोदरच या निवडणूकीच्या बंदोबस्ताची तयारी कऊन, जिह्यातील सुमारे अडीच हजार पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांविरोधी प्रतिबंधात्मक कारवाई करीत, हद्दपार केले होते. मतदान केंद्राच्या ठिकाणी वादावादी, हुल्लडबाजी करणाऱ्या वरती करडी नजर पोलिसांनी ठेवली होती. तसेच मतदान केंद्र परिसरात पोलिसांची गस्ती पथके सुध्दा नियुक्त केली होती. यामुळे जिह्यातील विधानसभेच्या दहा मतदारसंघात किरकोळ शाब्दीक बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.
मतदानाच्या बंदोबस्तासाठी जिल्हा पोलिस दलातील 2 हजार 550, मुंबई लोहमार्ग, तुरची प्रशिक्षण केंद्रातील 800, जिल्ह्यातील 447 होमगार्ड, कर्नाटक राज्यातील बेळगाव, बागलकोट, हसन, कोलार, कारवार, बंगळुरू, म्हैसूर येथील 3 हजार 360 होमगार्ड आणि सीएपीएफचे 600 जवान, एसएपीचे 300 जवान व एसआरपीएफचे 100 जवान असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर बुधवारी रात्री उशिरापर्यंत जिह्यातील सुमारे 200 मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्या मतदान केंद्रावरील मतदानाची प्रक्रिया देखील शांततेत पार पडल्याने, बंदोबस्तावरील पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.