For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत मतदान पूर्ण, मोठी चुरस

06:37 AM Nov 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत मतदान पूर्ण  मोठी चुरस
Advertisement

आज बुधवारी दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणे शक्य

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार  आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि डेमॉक्रेटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यात तीव्र चुरस असल्याचे चित्र दिसत आहे.

Advertisement

भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता मंगळवारी मतदानाला प्रारंभ करण्यात आला. जवळपास साडेआठ कोटी मतदारांनी यापूर्वीच मतदानाच्या अधिकाराचा उपयोग केला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत अमेरिकेचे पुढचे अध्यक्ष कोण असतील, यासंबंधीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्वरित मतगणनेस प्रारंभ करण्याची पद्धत आहे. अमेरिकेच्या भिन्न भिन्न प्रांतांमध्ये वेगवेगळ्या वेळी मतगणना पूर्ण होत असते आणि मतगणनेनुसार निर्णय घोषित केला जातो.

मोठी चुरस

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या इतिहासात एवढी चुरस यापूर्वी कधीही नव्हती, असे जाणकारांचे मत आहे. मतदानास प्रारंभ होण्यापूर्वी काही तास आधी घेण्यात आलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणात दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 49 टक्के मते मिळतील असे अनुमान व्यक्त करण्यात आले होते. मात्र, अमेरिकेत कोणत्या उमेदवाराला राष्ट्रीय पातळीवर किती मते मिळाली, याला फारसे महत्व नसते. तर कोणत्या प्रांतात कोणता उमेदवार जिंकतो याला अधिक महत्व असते.

निवडवृंदाची मते महत्वाची

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांची निवड तांत्रिकदृष्ट्या निवडवृंदाकडून केली जाते. प्रत्येक प्रांताचा स्वतंत्र निवडवृंद असतो. या निवडवृंदात (कॉलेजियम) त्या त्या प्रांताच्या लोकसंख्येच्या तुलनेत सदस्य असतात. असे एकंदर देशभरात 538 निवडवृंद सदस्य असतात. विजेत्या उमेदवाराला या 538 सदस्यांच्या 538 मतांपैकी कमीतकमी 270 मते मिळवावी लागतात. ज्या प्रांतात जो उमेदवार विजयी होतो, त्याला त्या प्रांतासाठी असलेल्या निवडवृंदातील सर्व सदस्यांची मते मिळतात. या पद्धतीमुळे काहीवेळा राष्ट्रीय पातळीवर कमी मते पडलेला उमेदवारही निवडवृंद सदस्यांच्या मतांची बेरीज अधिक झाल्याने राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो.

2016 मध्ये होती ही स्थिती

2016 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप यांना हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा राष्ट्रीय पातळीवर कमी मते पडली होती. तथापि, त्यांनी अधिक प्रांतांमध्ये बहुमत मिळविल्याने त्यांना मिळालेल्या निवडवृंद सदस्य मतांची संख्या अधिक झाली. परिणामी त्यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यंदा काय स्थिती असेल, ते आज बुधवारी दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

समान मते पडल्यास काय...

निवडवृंद मते दोन्ही उमेदवारांना समान पडल्यास राष्ट्राध्यक्षाची निवड अमेरिकन लोकप्रतिनिधीगृहाकडून केली जाते. लोकप्रतिनिधीगृहात ज्या उमेदवाराला बहुमत मिळेल तो राष्ट्राध्यक्षपदी निवडला जातो. तर उपराष्ट्राध्यक्षपदासाठी सिनेटमध्ये (वरीष्ठ सभागृह) मतदान घेतले जाते. सिनेटमधील मतदानात जो उमेदवार बहुमत मिळवेल तो उपराष्ट्राध्यपदी निवडला जातो. मात्र, दोन्ही उमेदवारांना समसमान निवडवृंद मते पडण्याची शक्यता नसल्यात जमा असते. आतापर्यंतच्या या देशाच्या इतिहासात असे एकदाही घडलेले नाही, अशी तज्ञांची माहिती आहे.

न्यू हँपशायरमध्ये समसमान मते

अमेरिकेतील न्यू हँपशायर येथील एका विभागात केवळ सहा मतदार आहेत. तेथे या सहा मतदारांच्या मतांची गणना करण्यात आली असून डोनाल्ड ट्रंप आणि कमला हॅरिस यांना प्रत्येक तीन मते मिळाल्याची घोषणा मंगळवारी संध्याकाळी करण्यात आली. या सहा मतांमध्ये जो उमेदवार बहुमत मिळवतो, तोच राष्ट्राध्यक्ष होतो, अशी समजूत अमेरिकेत रुढ आहे. यावेळी दोन्ही उमेदवारांना येथे समसमान मते मिळाल्याने एकंदरीत निवडणुकीत तीव्र चुरस असेल असे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. प्रत्येक निवडणुकीत याच विभागातील मतांची गणना आधी केली जाते. दोन्ही उमेदवारांमध्ये अधिकच स्पर्धा असेल, तर कदाचित अंतिम निर्णय घोषित होण्यास विलंब लागू शकतो, असेही मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :

.