For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशात 65 टक्क्यांवर मतदान

06:58 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशात 65 टक्क्यांवर मतदान
Advertisement

तिसऱ्या टप्प्यात तेराशेहून अधिक उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 93 लोकसभा जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजता संपले. निवडणूक आयोगाच्या प्राथमिक माहितीनुसार 65 टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. आसाममध्ये सर्वाधिक 75 टक्के लोकांनी मतदान केले असून महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाल्याचे मतदान टक्केवरून दिसून येत आहे. मतदानाची अंतिम टक्केवारी निवडणूक आयोगाकडून बुधवारी जाहीर होऊ शकते. या टप्प्यात तेराशेहून अधिक उमेदवारांचे राजकीय भतिवव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे.

Advertisement

देशातील वेगवेगळ्या राज्यातील 93 जागांसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 63.77 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान आसाममध्ये झाले असून त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये 73.93 मतदान झाले. महाराष्ट्रात पाच वाजेपर्यंत 53.40 टक्के तर कर्नाटकात 66.05 टक्के इतके मतदान झाले. आसाममधील धुबरी मतदारसंघात सर्वाधिक 90.66 टक्के मतदान झाले. तर मध्य प्रदेशातील भिंड मतदारसंघात सर्वात कमी 54.53 टक्के मतदान झाले.

बिहारमध्ये मतदानादरम्यान पीठासीन अधिकारी आणि होमगार्ड जवानाचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडच्या जशपूरमध्ये मतदानासाठी येत असताना एका वृद्ध मतदाराचा मृत्यू झाला. त्याचवेळी, पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादचे भाजप उमेदवार आणि टीएमसी समर्थकांमध्ये हाणामारी झाली. उत्तर प्रदेशातील संभलमध्ये पोलिसांनी लोकांवर लाठीचार्ज केल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या हाणामारीमध्ये काही जण जखमी झाले असून परस्परविरोधी तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील निशान उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. पंतप्रधानांनी पांढरा कुर्ता-पायजमा आणि भगवे जाकीट परिधान केले होते. तर अमित शहा भगव्या रंगाचा गमछा सोबत पांढरा कुर्ता-पायजमा परिधान करून आपला हक्क बजावण्यासाठी आले होते. मतदान केल्यानंतर पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जनतेला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच उष्णता पाहता भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही दिला.

सुरत मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेशभाई दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याचवेळी, अनंतनाग-राजौरी लोकसभा जागेसाठी मतदान आता तिसऱ्या ऐवजी सहाव्या टप्प्यात होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात विद्यमान सात मंत्र्यांचे भवितव्यही ईव्हीएममध्ये सील झाले आहे. या मंत्र्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे अशा बड्या नेत्यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.