For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकशाहीप्रधान राष्ट्रातील मतदानोत्सव

06:30 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकशाहीप्रधान राष्ट्रातील मतदानोत्सव
Advertisement

जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश असलेल्या भारतात मतदानोत्सव सुरू झालेला आहे आणि या एकूण 7 राज्यांच्या महोत्सवातील पहिला अधिकारोत्सव आज शुक्रवारी होणार आहे. एकूण 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 मतदार संघांसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि या पक्षाला आव्हान देणाऱ्या ‘इंडी’ आघाडीमध्ये जो सध्या संघर्ष पहायला मिळतोय तो पाहता पहिल्या टप्प्यातील ही निवडणूक अटीतटीचीच होणारी आहे. महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात निवडणुका होत आहेत. त्यातल्या त्यात देशातील एक लोकप्रिय नेते नितीन गडकरी यांच्या नागपूरमध्ये आज मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने प्रचारात सर्वत्र आघाडी घेतलेली आहे. सारा देश त्यांनी पुन्हा एकदा ढवळून काढला आहे. मोदींना आव्हान देण्यासाठी एकमेकांचे कधी तोंडदेखील न पाहणारी मंडळी एका मंचावर आलेली आहेत. विरोधी पक्षांनी एकत्रित अशी ‘इंडी’ आघाडी स्थापन केलेली आहे. म्हणजेच आपसातील लढाईचा सत्ताधारी भाजप लाभ उठवतोय म्हणून ही सर्व मंडळी एकत्र आलेली आहेत. जेणेकरून सर्व मते एकत्रित यावी आणि त्यामुळे भाजपचा पाडाव करणे शक्य होईल. परंतु हे खरोखरच शक्य होईल का? हा प्रयोग जर का यशस्वी ठरला तर पुढील पाच ते दहा वर्षे ही आघाडी मोदी व भाजपच्या भीतीने तरी एकत्रित येतील. आघाडीतील मुख्य घटक आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. आज काँग्रेस पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष आहे तरीदेखील इंडी आघाडीतील अनेक घटक पक्ष हे या पक्षालाच आव्हाने देणारेदेखील आहेत. अनेक पक्षांचे एकत्रित कडबोळे खरोखरच आपली ताकद दाखवू शकते काय! व हा प्रयोग कितपत यशस्वी होईल हे काळच ठरवेल. मात्र इंडीच्या कडबोळ्याला आव्हान देण्यासाठी सत्ताधारी भाजपनेदेखील एनडीएची यापूर्वीच स्थापना केलेली आहे. त्यात अनेक प्रादेशिक व राष्ट्रीय स्तरावरील दुय्यम पक्षांना बरोबर घेतलेले आहे. जेणेकरून ‘इंडी’ आघाडीला लाभ होऊ नये कारण सर्वच इतर पक्ष एकत्रित आले तर सत्ताधारी पक्षाला सर्वांचे एकत्रित आव्हान जड जाऊ शकते. आज पहिल्या टप्प्यातील या लोकशाही उत्सवातील सर्वात पवित्र दिवस आहे. यामध्ये एकूण 102 जागांसाठी मतदान होत आहे. त्यात 1625 उमेदवार रिंगणात आहेत पैकी केवळ 8 टक्के म्हणजेच 134 महिला उमेदवार आहेत इतर 1491 हे पुरूष उमेदवार आहेत. मागील म्हणजेच इ. स. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आज ज्या 102 मतदारसंघात निवडणूक होत आहे त्यातील सर्वाधिक 40 ठिकाणी भाजप विजयी झाला होता आणि द्रमुकने 24 काँग्रेस पक्षाने 15 व इतर पक्षांनी मिळून 23 जागांवर विजय संपादन केला होता. सध्याची स्थिती ही थोडी वेगळी आहे. सध्या अनेक राजकीय नेते गजाआड आहेत. भ्रष्टाचाऱ्यांना आत टाकण्याचा एक संकल्प भाजपने केलेला आहे. त्यामुळे बिथरलेल्या विरोधी पक्षांनी एकमेकांना धीर देत भाजप आणि मोदी विरोधात आघाडी उघडलेली आहे. विरोधी पक्षांना भीती वाटते ती मोदींची. ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांचा वापर राजकीयदृष्ट्या शस्त्रासारखा होतोय असे आरोप विरोधकांनी केलेले आहेत. येत्या 1 जूनला देशात 7 टप्प्यात मतदान होणार. आज होत असलेली निवडणूक ही यंदाच्या एकूण 7 टप्प्यांपैकी सर्वात जास्त मतदारसंघाचा समावेश असलेली निवडणूक आहे. देशातील 97 कोटी जनता 1 जूनपर्यंत आपल्या पवित्र अधिकाराचा वापर करतील. 44 दिवसांच्या या मतदान उत्सवाला आज अत्यंत उत्साहाने प्रारंभ होईल अशी अपेक्षा आहे. पुढील टप्पा हा दि. 26 एप्रिल रोजी आहे व त्यात 13 राज्यांतील 89 मतदारसंघांमध्ये निवडणुका होत आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीला सामोरे जात आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष्य भारतातील निवडणुकांकडे लागलेले आहे. कारण 143 कोटी जनतेच्या या देशात लोकप्रतिनिधी निवड प्रक्रिया कशी काय नियंत्रणात असते? याबाबत अनेक राष्ट्रांना कुतूहल असते. मात्र या देशाने आजवर लोकशाहीची सारी तत्वे पाळलेली आहेत. व आजवर या देशात लोकशाही तत्वानुसारच कारभार चालत आहे व चालत राहणार. यामुळेच नागरिकांना आपले लोकप्रतिनिधी निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. आज होत असलेल्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत संपूर्ण तामिळनाडूतील 39 जागा, राजस्थानमधील 25 पैकी 12 जागा, उत्तरप्रदेशमधील 80 पैकी 8 जागा, मध्यप्रदेशातील 29 पैकी 6 जागा, महाराष्ट्रातील 48 पैकी 5 जागा, उत्तरखंडातील सर्व 5 ही जागा, आसाममधील 14 पैकी 4 जागा, बिहारमधील 40 पैकी 4 जागा, प. बंगालमधील 42 पैकी 3 जागा व इतर छोट्या केंद्रशासित प्रदेशातील जागा आहेत. लोकसभा निवडणुकीत रंगत चढलेली आहे. देशातील नागरिक नेमके कोणत्याप्रकारे मतदान करतील याबाबत कमालीची उत्सुकता आहे. 1 जूनपर्यंत मतदान होत राहील आणि प्रत्यक्षात 4 जूनपर्यंत आपल्याला जनमताचा कौल कोणत्या दिशेने आहे हे समजण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. आजपासून प्रत्यक्षात मतदान होत आहे. संपूर्ण जगाला भारतातील लोकशाहीची तत्वप्रणाली पुन्हा एकदा होणाऱ्या मतदानातून स्पष्ट होईल. आपल्या सुदैवाने या देशातील राजकीय कारभारात कधीही संरक्षण दलांनी हस्तक्षेप केलेला नाही. आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये लोकशाहीच्या नावाखाली जे काही प्रकार होत आहेत ते पाहता बाहेरून कीर्तन आतून तमाशा सारखेच प्रयोग होत आहेत. त्यामुळेच इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना 1975 ते 1977 या दरम्यान 21 महिन्यांकरिता जी आणीबाणी लागू केली होती त्या काळ्याकुट्ट दिनाचा आजही या देशात निषेध होतोय व मागाहून इंदिरा गांधी यांनी आपल्या या एकाधिकारशाहीच्या कृत्याबद्दल साऱ्या देशाची माफी मागितली होती. आजही अनेक हयात मंडळी त्या काळातील आठवणी काढतात व संतापही व्यक्त करतात. म्हणजेच भारतात एकाधिकारशाही चालत नाही. आपला देश नेहमीच लोकशाहीप्रधान आहे आणि दर पाच वर्षांनी येणारे मतदान हा आपल्याकडे मतदानोत्सव म्हणून आपण साजराच करतो. आपल्या देशातील प्रत्येक मतदान हे निर्णायक ठरत असते त्यामुळेच मतदान हे अत्यंत आवश्यक असते. आणि 100 टक्के मतदान झाले तर या देशातील लोकशाही ही खऱ्या अर्थाने अत्यंत मजबूत ठरली यावर शिक्कामोर्तब होईल. असा सुदीन निर्माण होईल का?

Advertisement

Advertisement
Tags :

.