For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खाणपट्ट्यातील मतदारांचा कौल भाजपलाच

01:07 PM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
खाणपट्ट्यातील मतदारांचा कौल भाजपलाच
Advertisement

आश्वासनांवर खाण अवलंबितांनी दाखविला विश्वास, खाणी, डंप हाताळणी लवकर सुरू होण्याची गरज

Advertisement

सागे : दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता खाणी लवकर सूरू व्हाव्यात या आशेवर असलेल्या खाणपट्ट्यातील सांगे, सावर्डे, कुडचडे मतदारसंघांतील मतदारांनी भाजपला कौल दिल्याचे दिसून येते. खाणग्रस्त लोकांना आत्ता खाणी किंवा डंप हाताळणी व्यवहार लवकर सुरू झालेले हवेत. या भागातील खाण कामगार, ट्रकमालक, मशिनरी व्यावसायिकांनी भाजपला पसंती दिल्याचे दिसून येते.   मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रचारादरम्यान खाण अवलंबितांना एक आशेचा किरण दाखविला होता. त्यावर मतदारांनी विश्वास दाखविल्याचे दिसून येते. वास्तविक दक्षिण गोव्यातील सावर्डे मतदारसंघातील काले येथील एकमेव खाणीचा लिलाव झालेला आहे. पण अजून ती सुरू झालेली नाही. याव्यतिरिक्त अजून दक्षिण गोव्यातील इतर खाणांचा लिलाव झालेला नाही. गेल्या वर्षी ट्रकवाल्याना ई-लिलाव झालेल्या खनिजमालाची वाहतूक करण्याचे जेमतेम काम मिळाले. सुमारे लाख-दीड लाख खर्च करून ट्रक तयार करायचा आणि जेमतेम काम मिळायचे अशाने कसे चालेल, असा प्रश्न त्यातून उपस्थित झाला होता.

सांगे व सावर्डे मतदारसंघांत प्रत्यक्ष खाणी आहेत, तर कुडचडे मतदारसंघात जेटीचा समावेश आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सरकारने डंप हाताळणीला मंजुरी दिली होती. त्यामुळे आता सरकारी पातळीवर पुढील कृती होऊन ऑक्टोबरपर्यंत काम चालू होण्याची आशा या भागातील खाण अवलंबित बाळगून आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने खाणीचा विषय लावून धरला होता. त्यांच्या जाहीर सभांतून 2014 सालच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाणी बंद पडल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या गोव्यातील भाषणाच्या व्हिडीओ क्लिप्स दाखवून भाजप खाणी सुरू करण्याच्या बाबतीत गंभीर नसल्याचे चित्र उभे करण्यात आले होते. पण खाणव्याप्त भागांतील मतदारांनी भाजपलाच आघाडी दिली. त्यामुळे आता फार काळ लोकांना गृहीत धरून भाजपला चालणारे नाही.

Advertisement

येत्या ऑक्टोबरपूर्वी सांगे, सावर्डे या मतदारसंघांतील खाणींचा लिलाव तसेच डंप हाताळणी मार्गी लावावी लागेल. उपलब्ध वृतानुसार, ई-लिलाव झालेला खनिजमाल देखील फारसा नाही. त्यामुळे या मोसमात ट्रकवाले पूर्ण मोसमभर काम मिळत असेल, तरच ट्रक वाहतुकीस तयार ठेवतील याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सावर्डे मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात खाणी आहेत. येथे भाजपला 15618, तर काँग्रेसला 6277 मते मिळाली. येथे भाजपने 9341 मतांची आघाडी घेतली. या दोन्ही मतदारसंघांत 2012 नंतर असंख्य खाण कामगार बेकार झालेले आहेत. कुडचडे मतदारसंघात भाजपला 11300, तर काँग्रेसला 9603 मते मिळाली. येथे भाजपने 1697 मतांची आघाडी घेतली. खाणबंदीमुळे 2012 पासून या भागातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मध्यंतरी अडीच वर्षे खाण व्यवसाय नीट चालला तोच काय तो अपवाद. आत्ता लोकांना केव्हा खाणी किंवा डंप हाताळणी चालू होऊन एकदाचे कायमस्वरूपी काम मिळते असे झालेले आहे.

खाणव्याप्त भागांमध्ये भाजपच आघाडीवर

दक्षिण गोव्यात सांगे मतदारसंघात भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांना 12884, तर काँग्रेसला 7527 मते मिळाली. सांगे मतदारसंघात बहुतांश खाणी असून रिवण, कावरेपिर्ला भागांमध्ये खाणी आहेत. तेथे भाजपला 2262 मतांची आघाडी मिळाली. सांगे मतदारसंघातील आघाडी 5327 इतकी राहिली.

निवडणुकीत लाभ झाला मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांचा

सावंत सरकारने आजपर्यंत नऊ खाण ब्लॉक्सचा लिलाव केलेला आहे. त्यापैकी एक खाण प्रत्यक्षात सुरू झाली आहे. दक्षिणेतील विशेषत: सांगे आणि सावर्डेतील खाण ब्लॉक्सचा लिलाव कधी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री सावंत यांनी सावर्डे येथे माजी मंत्री दीपक पाऊसकर आणि त्यांच्या समर्थकांना पक्षप्रवेश देतेवेळी या भागातील खाणग्रस्तांचा प्रश्न आपल्याला माहीत असून केवळ निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यामुळे थोडा उशीर झाला आहे, असे म्हटले होते. डंप धोरणाखाली 12 संबंधितांना लवकरच मंजुरीपत्रे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याचबरोबर ट्रकमालकांचे प्रश्न सोडविणार असेही सांगितले होते. याचा निवडणुकीत फायदा झाला.

खाणी सुरु करण्याची प्रक्रिया गतिमान व्हावी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हापसा येथील जाहीर सभेत केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यास गोव्यातील खाणी येत्या दोन वर्षांत पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येतील असे जाहीर केले होते. त्यामुळे आता सरकारला प्रक्रिया गतिमान करावी लागेल. 2027 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी खाण व्यवसायाला गती प्राप्त होणे आवश्यक असून त्याकडे भाजपला शेवटची संधी यादृष्टीने पाहावे लागेल.

Advertisement
Tags :

.