पुढील आठवड्यात तामिळनाडूत मतदारयादी सर्वेक्षण सुरू होणार
निवडणूक आयोगाची मद्रास उच्च न्यायालयाला माहिती
वृत्तसंस्था/ चेन्नई
बिहारनंतर आता तामिळनाडूमध्ये मतदारयादीची विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) करण्याची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने मद्रास उच्च न्यायालयाला यासंबंधी माहिती देताना सर्वेक्षणाची ही प्रक्रिया पुढील आठवड्यात तामिळनाडूसह निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये सुरू होईल असे सांगितले आहे. बिहारप्रमाणेच तामिळनाडूमध्येही ही प्रक्रिया एका आठवड्यात सुरू होईल, असे निवडणूक आयोगाने मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मनिंद्र मोहन श्रीवास्तव आणि न्यायमूर्ती जी. अरुलमुरुगन यांच्या नेतृत्त्वातील खंडपीठाला कळवले आहे. तसेच प्रस्तावित एसआयआर दरम्यान याचिकाकर्त्याच्या तक्रारीचा विचार केला जाईल, असेही निवडणूक आयोगाने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने याचिकाकर्त्याची विनंती मान्य करत सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब केली. तसेच निवडणूक आयोगाला बिहार एसआयआरशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत सादर करण्याचे निर्देश दिले.