For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशात लोकशाही जिवंत राहण्यासाठी काँग्रेसला मतदान करा

10:23 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशात लोकशाही जिवंत राहण्यासाठी काँग्रेसला मतदान करा
Advertisement

बरगाव येथील काँग्रेसच्या प्रचारसभेत माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांचे आवाहन

Advertisement

वार्ताहर /नंदगड

भारत देशात संविधान असल्यामुळेच त्यानुसार निवडणूक होते. सर्व काही व्यवस्थित चालते.लोक गुण्यागोविंदाने राहतात. एकता व एकात्मता नांदण्यास मदत होते. संविधानचा मानसन्मान काँग्रेसने नेहमीच केला आहे. देशात मतस्वातंत्र्य व लोकशाही जिवंत राहण्यासाठी काँग्रेस पक्षाची गरज आहे. त्यासाठी समस्त जनतेने काँग्रेस पक्षालाच मतदान करावे, असे आवाहन माजी मंत्री  आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी केले. बरगाव येथे कारवार लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या प्रचारसभेत आर. व्ही. देशपांडे बोलत होते. ते म्हणाले, गेल्या 40 वर्षापासून खानापुराशी माझा संबंध आहे. खानापूरच्या विकासाबरोबरच येथील लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाचही गॅरंटी योजनांवर टीका केली होती. परंतु या टीकेचा विचार न करता काँग्रेसने निवडणुकीतील आश्वासनानुसार कर्नाटकात पाचही गॅरंटी उत्तमप्रकारे राज्यातील लोकांना देत आहे.  देशात भाजपच्या सरकारने महागाई वाढवून गोरगरीब जनतेला जगणे मुश्किल केल्याची खंत व्यक्त केली. त्यापेक्षा काँग्रेस सरकार नेहमीच गरिबांच्या पाठीशी राहिले. यापुढे देशात पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादित मालावर कायद्याने दर निश्चित करणार आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. शेती पिकांचे नुकसान झाल्यास 30 दिवसाच्या आत भरपाई दिली जाईल.

Advertisement

रोहयो कामगारांना कमीत कमी 400 रुपये मजुरी मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे. निरूद्योगी लोकांना उद्योग मिळावे म्हणून अनेक उद्योगधंदे स्थापन करणार आहे. महागाईवर नियंत्रण आणून सर्वांचे जगणे सुलभ करणार असल्याच्या विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्यासपीठावर उमेदवार अंजली निंबाळकर, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, अनिता दंडगल, वैष्णवी पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंब्बाणा होसमणी, प्रसाद पाटील, मजहर खानापुरी, राजाराम गुरव आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उमेदवार माजी आमदार अंजली निंबाळकर म्हणाल्या, आपण खानापूरच्या आमदार असताना सरकारदरबारी आवाज उठवून खानापूरच्या विकासासाठी मोठा निधी आणला. अनेक कामे मार्गी लागली. रस्ते, पाणी, विद्युत, उच्च शिक्षण आदी विकासकामे झाली. तालुक्यात सुमारे 3 हजार घरे मंजूर करून आणली. सध्या खानापूर तालुक्यात भाजपचे आमदार आहेत. गेल्या दहा महिन्यात त्यांच्याकडून विकासकामाचा एकतरी नारळ फुटला काय, असा प्रश्नही त्यांनी लोकांना केला. राज्यातील सध्याच्या काँग्रेस सरकारने गृहलक्ष्मी, गृहज्योती, शक्ती योजना, अन्नभाग्य, युवा निधी योजना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राबवून जनकल्याण केले आहे. काँग्रेसचे सरकार हे गोरगरिबांचे, सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने काँग्रेसलाच मतदान करावे, असे आवाहन केले. सभेला गर्लगुंजी, बरगाव, खानापूर, इदलहोंड, देवलत्ती परिसरातील अनेक महिलांसह नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.