काँग्रेसला तालुक्यातून उच्चांकी मतदान करा
अंजली निंबाळकर यांचे आवाहन : निट्टूर, इदलहोंड, सिंगीनकोप, हलकर्णी येथे प्रचार
खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघात खानापूर तालुक्याला पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली आहे. मराठा समाजाच्या कर्तृत्ववान माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने तालुक्याचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचविण्याची संधी आहे. या संधीचे सोने करण्याची वेळ मतदारांची आहे. मतदारांनी यावेळी डॉ. अंजली निंबाळकर यांना मताधिक्य द्यावे, आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे आवाहन वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी यांनी निट्टूर येथील कोपरा सभेत केली. कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी मंगळवारी अर्ज भरल्यानंतर खानापूर तालुक्यातील निट्टूर, इदलहोंड, सिंगीनकोप, हलकर्णी गावात प्रचारफेरी काढली. यावेळी कोपरा सभाही घेण्यात आल्या. उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, तालुक्यातील समस्त नागरिकांचा हा सन्मान आहे. इतिहासात पहिल्यांदाच खानापूर तालुक्याला उमेदवारी मिळाली आहे. गेल्या 30 वर्षात या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांनी विकास केला नाही. माझा दृष्टिकोन हा विकासात्मक असल्याने मी निवडून आल्यास तालुक्याचा निश्चितच कायापालट करणार आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. निट्टूर येथील नरेगा योजनेतील महिला कामगारांना भेटून मतदान करण्याचे आवाहन केले. यानंतर इदलहोंड येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. त्यानंतर सिंगीनकोप येथे मतदारांना भेटून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. हलकर्णी येथील कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचार करण्यात आला. यावेळी उमेदवार अंजली निंबाळकर, प्रसाद पाटील, यशवंत बिरजे, विनायक मुतगेकर, राजेश पाटील, कृष्णा कुंभार, म्हात्रू धबाले, अनिता दंडगल, महादेव कोळी, जोतिबा गुरव, प्रमोद सुतार, गंगाराम गुरव, रामचंद्र पाटील, राजेश नाईक यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.