वोट बँकेनेच व्यापाऱ्यांचे प्रश्न सुटणार
कोल्हापूर :
कोणतेही संकट आल्यानंतर व्यापारी समाजामध्ये मदतीसाठी पुढे असतात. शासनाला करातून महसुल मिळवून देतात. परंतू व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी शासन दरबारी व्यापारी वर्ग नेहमी दुर्लक्षित राहत आहे. व्यापारी म्हणजेच चोरच असल्याची वागणूक प्रशासन देते. हे चित्र बदलण्यासाठी, सन्मान मिळविण्याठी संघटीत झाले पाहिजे. व्यापाऱ्यांचे प्रश्न शासनपातळीवर सोडविण्यासाठी वोट बँक करावी लागेल, असे प्रतिपादन मुंबई चेंबर ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे चेअरमन मोहन गुरनानी यांनी केले.
कोल्हापूर ‘चेंबर ऑफ कॉमर्स’च्या 2024 चे पुरस्कार वितरण प्रसंगी ‘व्यापार, उद्योगावरील आव्हाने-संधी व संघटनेचे महत्व’ या विषयावर ते बोलत होते. गोविंदराव टेंबे रंगमंदीर, देवल क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. चेंबर ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे प्रेसिंडेंट दीपेन आगरवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुरनानी म्हणाले, कोरोनामध्ये व्यापारी संकटात होते. अनेकांचे उद्योग बंद पडले असतानाही लोकांच्या मदतीसाठी व्यापारी धावून आले. व्यापारी समाजातून उत्पन्न मिळवून ते पुन्हा समाजासाठी देणारा एकमेव घटक आहे. शासनाला करही व्यापारीच देतात. तरीही सरकारी पातळीवर व्यापारी दुर्लक्षित राहतो. निधी दिला जातो. निवडणूकीत मतेही दिली जातात. परंतू हेच नेते सत्तेवर आल्यानंतर व्यापाऱ्यांच्या प्रश्न बेदखल करतात. वोट बँक नसल्यानेच ही स्थिती झाली आहे. वोट बँक असल्यानेच शेतकऱ्यांचा नेत्यांवर दबाव राहतो. त्यामुळे सरकार त्यांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने मार्गी लावते. व्यापारी एकजुट नाहीत. त्यामुळे प्रश्न सोडवण्यासाठी वोट बँक तयार करावी लागेल. सर्वजण एकत्र आल्यानेच एलबीटी हाणून पाडला. सेल्स टँक्सही एकजुटीने हटविला. वास्तविक व्यापाऱ्यांची शक्ती मोठी आहे. परंतू ती ओळखलेले नाही. राज्यात 5 कोटी व्यापारी असून 20 कोटी मतदार आहेत. 15 ते 20 टक्के मते असून ही निर्णयक आहेत. व्यापाऱ्यांनी आता जागे झाले पाहिजे. सरकार दरबारी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वजण एकजुट झाले पाहिजे. पुरस्कार मिळाल्याबद्दल शंकुतला बनसोडे, सीमा शहा यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन मनिष आपटे यांनी तर आभार चेंबरचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे यांनी मानले. ऑल इंडिया कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशिल पाटील, चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, ज्येष्ठ संचालक आनंद माने, वैभव सावर्डेकर, राहूल नष्टे, संपत पाटील, अजित कोठारी, जयेश ओसवाल, प्रदीप कापडीया, अनिल धडाम आदी उपस्थित होते.
- वीज दर वाढ रद्द झाली पाहिजे : संजय शेटे
चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूरचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, वीजदरवाढीमुळे फाँड्री उद्योगाचे कंबरडे मोडणार आहे. वीज दरवाढीसह व्यापाऱ्यांवरील अन्यायी ई कॉर्मस कायदा, व्यवसाय कर, फुड सेप्टी कायदा रद्द झाला पाहिजे. जीएसटीची नियमात बदल केल्यानंतर महिन्यांची मुदत दिली पाहिजे.
- व्यापाऱ्यांना चोराप्रमाणे वागणूक
कर भरतो, देशाला आथिंक मजबूत करतो. सामाजिक काम करतो. तरही प्रशासनाच्या पातळीवर व्यापाऱ्यांना चोरा प्रमाणे वागणूक मिळते. हे चित्र बदलायचे असेल आणि सन्मान मिळवायचा असेल तर संघटीत झाले पाहिजे, असे आवाहन मोहन गुरनानी यांनी केले. परदेशात कर देणाऱ्या व्यापाऱ्यांना सामाजिक सुरक्षासह सोयी मिळतात. कराचा परतावाही दिला जातो. भारतामध्येही याचे अनुकारण व्हावे, असे गुरनानी यांनी सांगितले.
- राज्य व्यापारी कल्याण महामंडळाची मागणी
राज्य व्यापारी कल्याण महामंडळ स्थापनासाठी अग्रही आहे, यासाठीचा आराखडाही तयार केला जात आहे. या माध्यमातून व्यापाऱ्यांचे प्रश्न निकाली निघणार आहेत. हे महामंडळ त्वरीत करावे, अशी मागणी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे करा, असे आवाहन चेंबर ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे प्रेसिडेंट दीपेन आगरवाल यांनी केले.
- पुरस्काराने सन्मानित झालेले उद्योजक
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार हा भानुदास गोविंद रायबागे (रायसन्स ग्रुप) यांना देण्यात आला. याचबरोबर कै. परशराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार मुबारक गौसलाझम शेख (न्यू मेल्टिंग सेंटर प्रा. लि.), कै. वर्धीभाई परीख व्यापार पुरस्कार शकुंतला बाबुराव बनछोडे (अन्नपुर्णा स्पाईसेस प्रा. लि.), कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार उद्योग पुरस्कार सीमा संजय शहा (सीमाज् मोहक फूडस् एलएलपी) व संदीप सुधाकर पोरे (पोरे ग्रुप, गेनमॅक्स फेरोकास्ट प्रा. लि.) यांना देण्यात आला.