फोक्सवॅगन भारतात बनवणार इलेक्ट्रिक कार्स
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर्मनीतील कार निर्माती कंपनी फोक्सवॅगन यांनी इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती भारतात करणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी गुंतवणुकीची योजना कंपनीने तयार केल्याचे सांगण्यात येते. पॅसेंजर कारसंबंधीत भारताचे ब्रँड संचालक आशिष गुप्ता यांनी वरील माहिती दिली आहे.
देशात इलेक्ट्रिक कार तयार करण्यासोबत विस्ताराचीही कंपनी योजना बनवत आहे. इलेक्ट्रिक कार आय डी 4 ही नवी पहिली गाडी 2024 मध्ये लाँच करण्याच्या तयारीला कंपनी लागली आहे. आय डी 4 च्या निर्मितीचे कार्य महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये घेतले जाणार आहे. देशांतर्गत कार निर्मितीला कंपनीचे आगामी काळात प्राधान्य असणार असून 2026-27 पर्यंत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार्स बाजारात दाखल करण्याचा इरादा आहे. पुढील 3 ते 4 वर्षासाठी इलेक्ट्रिक कार्सच्या सादरीकरणाची तयारी करण्यात येत आहे. या निर्मिती कार्यासाठी गुंतवणूकीचे नियोजन करण्यात आलेले असले तरी त्याबाबतचा आकडा कंपनीने सांगितलेला नाही.
46 कार्स करणार लाँच
आगामी कालावधीत 46 इलेक्ट्रिक कार्स भारतात लाँच करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची बाजारात वाढती मागणी असून ही बाजारपेठ अधिक स्पर्धेची असणार आहे. अनेक ऑटो दिग्गज कंपन्यांनी या गटात प्रवेश मिळवत नव्या इलेक्ट्रिक कार्स सादर करण्यास सुरुवात केली आहे. हे पाहूनच फोक्सवॅगनही इलेक्ट्रिक कार्स सादरीकरणावर आगामी काळात भर देणार आहे.