इंडोनेशियात ज्वालामुखी विस्फोट, 11 ठार
3 किलोमीटर उंचीपर्यंत उठले धूराचे लोट
वृत्तसंस्था/ जकार्ता
इंडोनेशियात सोमवारी मारापी ज्वालामुखीत विस्फोट झाला असून यामुळे 11 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. बचावपथकानुसार अद्याप 12 जणांचा शोध घेतला आहे. तर 49 जणांना वाचविण्यास यश आले आहे. रविवारी 2,891 किलोमीटर उंचीवर स्थित ज्वालामुखीतून सुमारे 3 किलोमीटरच्या उंचीपर्यंत धूराचे लोट निर्माण झाले होते. याच्या आसपासच्या भागांमध्ये रस्ते आणि वाहने राखेने भरून गेली आहेत.
ज्वालामुखीत सोमवारीही विस्फोट झाल्याने बचावकार्य काही काळासाठी रोखण्यात आले होते. मारापीचा अर्थ आगीचा पर्वत असा होतो. हा सुमात्रा बेटावरील सर्वात सक्रीय ज्वालामुखी आहे.
पर्वतावर चढाईचे दोन मार्ग ज्वालामुखी विस्फोटाच्या ठिकाणाच्या नजीक आहेत, हे दोन्ही मार्ग आता बंद करण्यात आले आहेत. तसेच ज्वालामुखीच्या मुखापासून 3 किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावांना खबरदारीदाखल रिकामी करविण्यात आले आहे. विस्फोटानंतर ज्वालामुखीतून लाव्हारस बाहेर पडण्याची शक्यता आहे. इंडोनेशियन बेटसमूह प्रशांत रिंग ऑफ फायरवर स्थित असून तेथे महाखंडीय प्लेट्स परस्परांना धडकत असल्याने ज्वालामुखी आणि भूकंपीय हालचाली होत असतात.