रशियात भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक
नव्या आपत्तीमुळे लोकांमध्ये घबराट
वृत्तसंस्था/मॉस्को
भूकंपाच्या धक्क्यातून रशियातील लोक सावरत असतानाच आता ज्वालामुखी उद्रेकाच्या नव्या आपत्तीमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. भूकंपाच्या काही तासांनंतर रशियाच्या एका दुर्गम भागात असलेल्या क्लुचेव्हस्काया येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. यानंतर खबरदारी म्हणून पॅसिफिक किनाऱ्याच्या काही भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. क्लुचेव्हस्कायात अजूनही उद्रेक सुरू असून ज्वालामुखीच्या वर नारिंगी ज्वाला दिसून येत आहेत. रशियामध्ये कामचटका द्वीपकल्पाजवळ बुधवारी 8.8 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की त्याचे धक्के सुमारे 10 हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या इटली, स्पेन, पोर्तुगाल आणि अगदी मोरोक्कोमध्येही जाणवले.
आतापर्यंतच्या इतिहासातील हा सहावा सर्वात मोठा भूकंप आहे. यामुळे रशिया, जपान, अमेरिकेतील हवाई आणि पॅसिफिक महासागरात सुनामीचा धोका वाढला होता. मार्च 2011 नंतरचा हा भूकंप जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जातो. सुनामीचा धोका लक्षात घेत जपानमधील सर्व देशांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, या आपत्तीत कोठेही मोठी जीवितहानी झालेली नाही. सुनामीचा धोकाही आता टळला असला तरी रशिया, जपान आणि अमेरिकेत अजूनही सतर्कता कायम आहे. दक्षिण अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील चिली आणि कोलंबियामध्ये नवीन इशाऱ्यांमुळे लोकांना त्यांची घरे रिकामी करावी लागत आहेत. त्याचवेळी, जपान सरकारने देखील खबरदारी घेत समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या 20 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.