For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, ज्यूधर्मीय लक्ष्य

06:56 AM Dec 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला  ज्यूधर्मीय लक्ष्य
Advertisement

सिडनीच्या बीचवर सण साजरा करणाऱ्या ज्यूधर्मीयांवर गोळीबार : दहशतवाद्यासह 12 जणांचा मृत्यू : 

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील प्रसिद्ध बॉन्डी समुद्र किनाऱ्यावर सण साजरा करणाऱ्या ज्यूधर्मीयांच्या दिशेने दोन दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात कमीतकमी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन पोलीस अधिकाऱ्यांसमवेत 11 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोनपैकी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे, तर दुसरा पकडला गेला असून तो गंभीर जखमी असल्याचे समजते. पोलिसांनी एका दहशतवाद्याची ओळख पटविली असून तो 24 वर्षीय नवीद अक्रम असून सिडनीचाच रहिवासी आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथोनी अल्बनीज यांनी या घटनेला स्तब्ध करणारी आणि दु:खद संबोधिले. तसेच बॉन्डी बीचवर झालेल्या गोळीबाराला दहशतवादी हल्ला घोषित केले आहे.

Advertisement

पोलिसांनी एका दहशतवाद्यासमेत 12 जणांच्या मृत्यूची पुष्टी दिली आहे. हा हल्ला 8 दिवसीय ज्यू सण हनुक्काच्या पहिल्या रात्री झाला आहे. ज्यूधर्मीय सणाच्या प्रारंभानिमित्त समुद्र किनाऱ्यावर आयोजित एका कार्यक्रमासाठी शेकडोंच्या संख्येत जमले असताना हा हल्ला झाला आहे.  दहशतवाद्यांनी लहान मुले आणि वृद्धांना अंदाधुंद गोळीबार करत लक्ष्य केले.

संबंधित कार्यक्रम ज्यू संघटना चाबादकडून आयोजित करण्यात आला होता आणि यात सुमारे 2 हजार ज्यूधर्मीय मेणबत्ती पेटविणे आणि धार्मिक विधीसाठी एकत्र आले हेते. रविवारी संध्याकाळी सुमारे 6.45 वाजता (स्थानिक प्रमाणवेळ) अचानक दोन दहशतवाद्यांनी जमावाच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. या भीषण गोळीबाराच्या घटनेत ज्यू समुदायाचे प्रमुख नेते आर्सेन ऑस्ट्रोव्स्की जखमी झाल्याची पुष्टी इस्रायलच्या विदेश मंत्रालयाने दिली आहे.

दहशतवाद्याकडील बंदूक घेतली काढून

दहशतवाद्यांच्या हल्ल्यादरम्यान एका व्यक्तीने प्रसंगावधान अन् साहस दाखवत एका दहशतवाद्याच्या हातातील बंदूक  काढून घेत आणखी जीवितहानी रोखण्याची कामगिरी केली आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद असून आता या व्यक्तीचे सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे. दहशतवाद्यासोबत हा व्यक्ती झटापट करत असल्याचे आणि मग बंदूक स्वत:कडे घेत ती दहशतवाद्याच्या दिशेने रोखत असल्याचे या व्हिडिओत दिसून येते.

हल्ल्याशी निगडित व्हिडिओ व्हायरल

या हल्ल्याशी संबंाित काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एक समुद्रकिनारी आणि परिसरात लोक गोळीबाराचा आवाज ऐकून दिसेल त्या दिशेने पळत असल्याचे दिसून येते. तर एका अन्य व्हिडिओत काळ्या रंगाचा शर्ट घातलेला दहशतवादी गोळीबार करताना दिसून येतो. या दहशतवाद्याला एका अन्य इसमाने पकडत त्याच्या हातातील बंदूक काढून घेतली होती.

द्वेष, हिंसा, दहशतवादाला स्थान नाही

हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज यांनी देशाला संबोधित केले आहे. ज्यूधर्मीयांवर केलेला हल्ला हा प्रत्येक ऑस्ट्रेलियन नागरिकावर करण्यात आलेला हल्ला आहे. आमच्या देशात द्वेष, हिंसा आणि दहशतवादासाठी कुठलेच स्थान नाही. दहशतवादाला आम्ही पूर्णपणे संपवू असे मी स्पष्ट करू इच्छितो असे अल्बनीज यांनी म्हटले आहे.

दु:खाच्या या क्षणी ऑस्ट्रेलियाच्या लोकांसोबत

ऑस्ट्रेलियाच्या बॉन्डी बीचवर ज्यूंचा सण हनुक्काच्या पहिल्या दिवशी जल्लोष करणाऱ्या लोकांना लक्ष्य करत करण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याची आम्ही कठोर निंदा करतो. या हल्ल्यात स्वत:च्या प्रियजनांना गमाविलेल्या परिवारांबद्दल भारताच्या वतीने मी तीव्र संवेदना व्यक्त करतो. दु:खाच्या या क्षणी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या लोकांसोबत आहोत. भारत दहशतवादाबद्दल शून्य सहिष्णूता बाळगतो आणि दहशतवाद विरोधातील सर्व प्रकारच्या लढाईंचे समर्थन करतो असे पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.

इस्रायलच्या राष्ट्रपतींची प्रतिक्रिया

इस्रायलचे राष्ट्रपती इसहाक हर्जोग यांनी हनुक्काच्या सणानिमित्त पहिली मेणबत्ती पेटविण्यासाठी समुद्र्र किनाऱ्यावर गेलेल्या ज्यूधर्मीयांवर दहशतवादी हल्ला करण्यात आल्याचे म्हटले आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये गाझामध्ये इस्रायलचे युद्ध सुरू झाल्यापासून ऑस्ट्रेलियात ज्यूविरोधी अनेक हल्ले झाले आहेत, ज्यात कार, प्रार्थनास्थळ, इमारतींना लक्ष्य करण्यात आले असल्याचे हर्जोग यांनी नमूद केले.

11 वर्षांनी पुन्हा सिडनी लक्ष्य

हा दहशतवादी हल्ला सिडनीच्या लिंड्ट कॅफेमध्ये एका दहशतवाद्याने 18 लोकांना ओलीस ठेवण्याच्या घटनेच्या सुमारे 11 वर्षांनी झाला आहे. 16 तासांपर्यंत चाललेल्या त्या घटनेत दोन ओलीस आणि एक दहशतवादी मारला गेला होता.

जर आम्हाला जाणूनबुजून अशाप्रकारे लक्ष्य करण्यात आले असेल तर ही एक अशी भयावह घटना आहे, ज्याची आम्ही कल्पनाही करू शकत नव्हतो.

एलेक्स रिवलिन

ऑस्ट्रेलियन ज्यू समुदायाच्या परिषदेचे अधिकारी

या हिंसक घटनेची आम्ही कठोर निंदा करतो. कुठल्याही प्रकारचा दहशतवाद आणि निर्दोष लोकांना लक्ष्य करण्याच्या घटनांना पूर्णपण्s अस्वीकारार्ह आहेत.

विदेश मंत्रालय, कतार

दहशतवादी हल्ल्याची टाइमलाइन (ऑस्ट्रेलियाच्या प्रमाणवेळेनुसार)

संध्याकाळी 6.45 वाजता

बॉन्डी बीचवर गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस वाहने अन् रुग्णवाहिका दाखल

रात्री 7.05 वाजता

पोलिसांनी लोकांना बॉन्डी बीचपासून दूर राहण्याचा आग्रह केला आणि घटनास्थळावरील लोकांना सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना

रात्री 7.45 वाजता

पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले

रात्री 8.35 वाजता

रुग्णवाहिकांद्वारे 16 जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.

रात्री 8.45 वाजता

एका दहशतवाद्यासमवेत 12 जणांचा मृत्यू, 2 पोलीस अधिकाऱ्यांसह 11 जण जखमी झाल्याची पुष्टी मिळाली.

Advertisement
Tags :

.