व्होडाफोन-आयडिया 45,000 कोटी उभारणार
संचालक मंडळाची मंजुरी : समभागावर दिसून आला प्रभाव : इक्विटी व इतर माध्यमातून रक्कम उभारणी
नवी दिल्ली :
दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया (व्हीआय) च्या संचालक मंडळाने कर्ज आणि इक्विटीच्या माध्यमातून 45,000 कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. कंपनी आपल्या 4 जी सेवेची व्याप्ती वाढवण्यासाठी, 5 जी नेटवर्क तयार करण्यासाठी आणि क्षमता वाढवण्यासाठी सदरील उभारलेल्या रक्कमेचा वापर करणार असल्याची माहिती आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, पुढील तिमाहीपर्यंत नवीन गुंतवणूक आणून इक्विटी आणि/किंवा इतर इक्विटी संबंधित साधनांद्वारे 20,000 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे.
कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बाह्य गुंतवणूकदाराकडून भांडवल उभारणीबाबत चर्चा चांगली झाली आहे, परंतु त्यांनी त्याबाबत काही स्पष्ट केले नाही. भांडवल उभारणी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी बँकर्स, वकील आणि सल्लागारांची नियुक्ती करण्याची जबाबदारी मंडळाने कंपनीला दिली आहे.
या माध्यमातून उभारणार फंड
कंपनीने म्हटले आहे की बाँड्सचे सार्वजनिक इश्यू, परिवर्तनीय डिबेंचर, वॉरंट्स, ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट्स, अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट्स किंवा फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बाँड्स, प्रायव्हेट प्लेसमेंट, प्रेफरेंशियल इश्यू किंवा पात्र संस्थात्मक प्लेसमेंट यासारख्या कोणत्याही माध्यमातून इक्विटी भांडवल उभारले जाऊ शकते.
2 एप्रिलच्या बैठकीत प्रस्तावावर मंजुरी घेणार
इक्विटी वाढवण्याच्या प्रस्तावित मोहिमेत प्रवर्तकही सहभागी होतील. आदित्य बिर्ला समूहाची व्होडाफोन आयडियामध्ये 18.1 टक्के, केंद्र सरकारची 33 टक्के आणि ब्रिटनच्या व्होडाफोन समूहाची 32.3 टक्के हिस्सेदारी आहे. पूर्वी, व्होडाफोन समूहाने भारतीय युनिटमध्ये आणखी भांडवल टाकण्यास नकार दिला होता.
मंजुरीच्या या वृत्ताचा परिणाम व्होडा-आयडियाच्या शेअर्सवरही दिसून आला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये बुधवारी कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांनी वाढून 16 रुपयांवर बंद झाले, ज्यामुळे कंपनीचे एकूण बाजारमूल्य 77,254 कोटी रुपये झाले.
एका विश्लेषकाने सांगितले की, ‘उद्या कंपनीच्या शेअरवर दबाव दिसू शकतो कारण बाजाराला नवीन गुंतवणुकीच्या घोषणेची अपेक्षा होती, जी अद्याप आलेली नाही. याआधीही कंपनीने भांडवल उभारणीसाठी असे प्रस्ताव स्वीकारले आहेत.
कंपनीने सांगितले की ते कर्ज उभारण्यासाठी सावकारांशी देखील बोलत आहे परंतु हे काम भाग भांडवल वाढवल्यानंतर केले जाईल. सध्या कंपनीवर बँकांचे सुमारे 4,500 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
व्होडा-आयडियाने सांगितले की, ‘या गुंतवणुकीमुळे कंपनीला स्पर्धेत पुढे जाण्यास आणि ग्राहकांना चांगली सेवा देण्यास मदत होईल. ‘कंपनीने म्हटले आहे की, अलीकडच्या काळात तिच्या कामकाजात सुधारणा झाली आहे आणि गेल्या 10 तिमाहीत 4जी ग्राहकांची संख्या आणि प्रति वापरकर्ता सरासरी महसूल देखील वाढला आहे.’
दूरसंचार सेवा पुरवत असलेल्या कंपन्यांना स्पर्धात्मक दरात डेटा आणि व्हॉईस सुविधा देण्यावर कंपनीचा भर आहे. डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा तोटा ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मधील 7,990 कोटी रुपयांवरून 12.5 टक्क्यांनी घसरून 6,985 कोटी रुपयांवर आला आहे.