व्होडाफोन-आयडियाचे तिमाही निकाल जाहीर
कंपनीचा तोटा 6,986 कोटीवर घसरला
नवी दिल्ली :
दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेड, आर्थिक अडचणींचा सामना करत असून, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत तिचा तोटा 6,986 कोटी रुपयांपर्यंत कमी झाला आहे. कंपनीने शेअर बाजाराला आपल्या तिमाही निकालाची माहिती दिली. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 7,990 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत व्होडाफोन आयडियाचा महसूल 10,673.1 कोटी रुपये होता. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 10,620.6 कोटींच्या तुलनेत महसूल जवळपास स्थिर आहे.
कंपनीने निवेदनात म्हटले आहे की प्रति वापरकर्ता सरासरी महसूल याच तिमाहीत 145 रुपये होता, तर आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत तो 135 रुपये होता. अशा प्रकारे वार्षिक आधारावर 7.4 टक्क्यांनी वापरकर्ता सरासरी महसुलात वाढ झाली आहे.
व्हीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुंद्रा म्हणाले, ‘गेल्या 11 तिमाहीत आमचा सर्वोच्च कर आणि व्याज कमाई 21.4 अब्ज रुपये नोंदवताना आम्हाला आनंद होत आहे. विकसित होत असलेल्या उद्योगस्थिती आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांच्या अनुषंगाने, आम्ही आमच्या ऑफरमध्ये सुधारणा केल्या आहेत आणि उत्पादनांवरही लक्ष केंद्रित केले आहे’.