For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विवेकानंद रॉक मेमोरियल : एकनाथ रानडेंचे योगदान

06:10 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
विवेकानंद रॉक मेमोरियल   एकनाथ रानडेंचे योगदान
Advertisement

शेवटच्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार गुरुवारी संध्याकाळी संपला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानधारणेला सुरुवात केली आणि जवळपास 45 तास ते ध्यानधारणा करणार आहेत. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधानांवर टीकेचा भडिमार करण्यास सुरुवात केली. या माध्यमातून कन्याकुमारीतील विवेकानंद रॉक मेमोरियलचे नाव ठळकपणे सर्वत्र चर्चेत आले. यात  रा. स्व. संघाचे एकनाथ रानडे यांचा वाटा नक्कीच वाखाणण्याजोगा होता.

Advertisement

तामिळनाडूतील दक्षिण टोकाला कन्याकुमारीत समुद्रकिनारी स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलची स्थापना 1970 मध्ये करण्यात आली. स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ हे रॉक मेमोरियल बांधण्यात आले. वावतुराई याठिकाणी असणारे हे मेमोरियल बांधण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा वाहणारे आर्किटेक्ट एकनाथ रानडे यांचा वाटा संस्मरणीय असाच म्हणायला हवा.

याच मेमोरियलच्या ठिकाणी कन्याकुमारी देवी(पार्वती) हिने भगवंत शिवाला प्रसन्न करण्यासाठी तपस्या केली होती. याचसोबत स्वामी विवेकानंद हे संपूर्ण भारतभरचा दौरा संपवून आल्यानंतर त्यांनी  याच मेमोरियल असणाऱ्या खडकावर 1892 मध्ये 3 दिवस ध्यानधारणा केली होती. त्यांच्या या ध्यानधारणेनंतरच खऱ्या अर्थाने या स्मारकाचे नामकरण स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल असे झाले. ज्या ठिकाणी ध्यानधारणेमधून त्यांना भगवंताकडून भारतमातेची सेवा करण्याचा संदेश मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीसपद वाहणारे एकनाथ रानडे यांना त्या काळी या मेमोरियलच्या कामाची जबाबदारी रामकृष्ण मठ व मिशनकडून देण्यात आली.

Advertisement

मेमोरियल समितीचे सचिव या अनुषंगाने एकनाथ रानडे यांनी या कामाची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळेला केंद्रीय मंत्री हुमायून कबिर यांनी या स्मारकाला विरोध केला होता. परिसराचे नैसर्गिक सौंदर्य खराब होईल, असा आरोप त्यांचा होता. हाच मुद्दा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांनी उचलला होता. कबीर हे कोलकाता विधानसभेचे असल्याने तेथे एकनाथ रानडे यांनी कबीर यांच्या मेमोरियलला विरोधाचे वृत्त वर्तमानपत्रातून छापून आणले. यांची आडकाठी पाहून रानडे यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याकडे धाव घेतली. एवढ्यावरच रानडे शांत राहिले नाहीत, लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या सुचनेवरुन त्यांनी 3 दिवसांमध्ये लोकसभेतील 323 सदस्यांच्या पाठिंब्याच्या सह्या घेतल्या. ज्या पंतप्रधानांकडे सुपूर्द करण्यात आल्या. मग मात्र मुख्यमंत्री भक्तवत्सलम यांना मेमोरियल उभारणीला पाठिंबा देण्यावाचून गत्यंतर उरले नाही. अशा तऱ्हेने मेमोरियलच्या स्थापनेला मुहूर्त मिळाला. याचदरम्यान तेथील स्थानिक कोळी कॅथोलीक वर्गाने क्रॉस उभारत हा खडक आपला असल्याचा दावा केला होता. हिंदुंनी याविरोधात मोठे आंदोलन केले. त्यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांनी सदरच्या जागेत विवेकानंद रॉक मेमोरियलच होईल, असे स्पष्ट करत दिलासा दिला. पण यापुढे सर्वात मोठा अडथळा होता तो स्मारकासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम उभारण्याचा. एकनाथ रानडे यांनी निधी उभारणीसाठी विविध राज्य सरकारांकडे धाव घेत त्यांना आवाहन केले.

राष्ट्रीय स्मारकासाठी त्यांनी सामान्य जनतेकडून एक एक रुपया देणगी स्वरुपात घेण्यास सुरुवात केली. अशा पद्धतीने पैशांची तजवीज करून मेमोरियलच्या उभारणीतील खर्चाची मोठी अडचण त्यांनी दूर केली. राजकीय अडथळे संपल्यानंतर रानडे यांनी झोकून देत आव्हाने पेलत विवेकानंद मेमोरियलच्या उभारणीत रस घेतला. उभारणीवेळी पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था करण्यासह कारागिरांची निवड करुन त्यांच्याकरवी काम करवुन घेण्याचे कामही त्यांनी लिलया पेलले.

2 सप्टेंबर 1970 रोजी अखेर मेमोरियलची स्थापना प्रत्यक्षात साकारली. या ठिकाणी ध्यानधारणेसाठी ध्यानमंडप बांधण्यात आला. विविध मंदिरांच्या शैलीचे अनुकरण रचना करण्यासाठी केले गेले. मेमोरियलच्या बाजुने बंगालचा किनारा, भारतीय किनारा आणि अरेबियन समुद्र किनारा आहे. ज्या ठिकाणी ध्यानधारणेमधून स्वामी विवेकानंदांना भगवंतांकडून भारतमातेची सेवा करण्याचा संदेश मिळाला.

Advertisement
Tags :

.