ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ले शहर समन्वयक विवेक आरोलकर यांचे निधन
वेंगुर्ले / प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ले शहर समन्वयक विवेक आरोलकर (४८) यांचे मंगळवारी दुपारी गोवा येथील बांबोळी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. वेंगुर्ले शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले विवेक आरोलकर गेले काही महिने आजारी होते. तरीही त्यांनी सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत सक्रियपणे काम केले होते. वेंगुर्ल्यात मानसी आर्ट सर्कल या संस्थेची स्थापना करून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली होती. मानसी आर्ट सर्कल तर्फे दरवर्षी खुली गीत गायन स्पर्धा घेतली जायची. या स्पर्धेमुळे विवेक आरोलकर यांची वेंगुर्ल्यात ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते. गेली अनेक वर्ष ते शिवसेनेचे सक्रिय व विश्वासू कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले होते. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ते उद्धव ठाकरे शिवसेनेची प्रामाणिक राहिले. कडवा व आक्रमक शिवसैनिक म्हणून वेंगुर्ल्यात त्यांची ओळख होती. ठाकरे शिवसेनेतर्फे वेंगुर्ल्यात साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. अल्पशा आजारामुळे ते अचानक निघून गेल्याने वेंगुर्ल्यात अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.