For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘विठू माऊली’ विशेषांकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

06:45 AM Jul 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘विठू माऊली’ विशेषांकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
Advertisement

प्रतिनिधी/ पंढरपूर

Advertisement

हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ।

  गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी ।।

Advertisement

या संतोक्तीनुसार चालणारी वारी परंपरा, वारकरी संप्रदाय आणि पंढरपूरचे वैशिष्ट्या संपूर्ण भारतभर चैतन्याचा विषय असतो. याच वारी परंपरेला साजेशी पंढरपुरातील समृद्ध परंपरा, मठ, मंदिरे आणि धर्मशाळा यांची रोचक आणि वैशिष्ट्यापूर्ण माहिती असलेला ‘विठू माऊली’ विशेषांक ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केला आहे.

या अंकाचे प्रकाशन आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरातील शासकीय विश्रामगृहाजवळील मैदानावर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘पर्यटनाची वारी, पंढरीच्या दारी’ या अनोख्या कीर्तन, पोवाडा व भजन कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृहातील मैदानावर आयोजित केले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘विठू माऊली’ या विशेषांकाचे भक्तिपूर्ण वातावरणात प्रकाशन झाले. यावेळी ‘तरुण भारत संवाद’चे विभागीय संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड,  सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक विजयकुमार देशपांडे, वृत्तसंपादक विनायक भोसले, सूरज पाटील, उपसंपादक श्रीशैल भद्रशेट्टी, सुनील उंबरे, पंढरपूर प्रतिनिधी संतोष रणदिवे, चैतन्य उत्पात, वितरण विभागाचे विनोद पोतदार आदी उपस्थित होते.

सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ‘पर्यटनाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी राज्य शासनाचा उत्कृष्ट भारूड पुरस्कार प्राप्त चंदाताई तिवाडी आणि त्यांच्या शिष्यांनी पर्यटन संवर्धन काळाची गरज असल्याचे आपल्या विनोदी शैलीतील भाऊडातून सादरीकरण केले. याप्रसंगी सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराजांनीही आपल्या वैदर्भीय शैलीतून पर्यावरण रक्षण काळाची गरज असल्याचे सांगितले. तर विठ्ठलाच्या पोवाड्यातूनही पर्यावरणचे संवर्धन कसे करावे याचे सादरीकरण झाले. सत्यपाल महाराज, चंदाताई तिवाडी यांनीही ‘तरुण भारत संवाद’च्या ‘विठू माउली’ विशेषांकाचे कौतुक केले.  या कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विठू माउली’ विशेषांकाचे प्रकाशन केले. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यांनीही केले विशेष कौतुक

यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनीही या विशेषांकाचे विशेष कौतुक करून ‘तरुण भारत संवाद’च्या टीमला शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Tags :

.